राणा जगजीतसिंह, तानाजी सावंत यांचा असाही " व्हॅलेंटाईन डे ' - valentine day and rana jagjitsing | Politics Marathi News - Sarkarnama

राणा जगजीतसिंह, तानाजी सावंत यांचा असाही " व्हॅलेंटाईन डे '

तानाजी जाधवर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

...............

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांनी आज "व्हॅलेंटाईन' डेचा मुहूर्त साधत आपल्या राजकीय विरोधकांना चांगलाच धक्का दिला. या दोन नेत्यांची पुण्यात भेट आणि चर्चा झाली, या चर्चेमुळे इथल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एरवी जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांना चेकमेट देण्यात धन्यता मानणाऱ्या राणा पाटील आणि सावंत यांची सध्या राजकारणात सारखीच अवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. अर्थात याचे श्रेय या दोघांनाही जाते. राणा पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला होता. 

 

राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार हे स्पष्ट होते. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला मोठी जबाबदारी मिळेल असा राणा पाटील यांचा कयास होता. पण राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने त्यांच्या आशेवर पाणी फिरले. तर दुसरीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि सत्ता असूनही आमदार तानाजी सावंत यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे सावंत यांनी मातोश्रीची पायरी न चढण्याचे ठरवले होते. आपली नाराजी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून दाखवून दिली होती. आता जिल्ह्याच्या राजकारणात राणा पाटील, सावंत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या तयारीत आहे. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सत्ता सध्या सावंत , राणा गटाकडे आहे. दोघांतील "राजकीय गट्टी' पाहता भविष्यात जिल्हा सहकारी बॅंकेसह अनेक महत्त्वाच्या निवडणुकामध्ये हे दोन मातब्बर नेते चमत्कार घडवू शकतात. त्याअनुषंगाने पुण्यात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झालेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या दोन सक्षम नेत्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याच्या "भुवया' मात्र उंचावल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख