वाजपेयींनी दिला होता बाळासाहेब ठाकरेंना कादंबरी लिहिण्याचा सल्ला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या दोघांचे स्वभाव भिन्न होते. तरीही ते एकत्र आले होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता. मतभेद झाले पण त्याने कधी वणव्याचे स्वरूप धारण केले नाही. वैयक्तिक मतापेक्षा भाजप आणि सेनेचे संबंध टिकविण्याला त्यांनी महत्त्व दिले.
वाजपेयींनी दिला होता बाळासाहेब ठाकरेंना कादंबरी लिहिण्याचा सल्ला

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युती १९९० पासून अगदी २०१४ पर्यंत टिकली. आता हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांवर सध्या आरोप करीत आहेत तसे वातावरण तेव्हा नव्हते. एकमेकांचे सच्चे मित्र असेच हे दोन्ही पक्ष होते.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी असे तीनही नेते या मैत्रीचे खांब होते. प्रमोद महाजन या नेत्यांमधील दुवा होते. 

शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ हा शिवतीर्थावर ठरलेला असायचा. यात भाजपकडून अटलबिहारी वाजपेयी यांची उपस्थिती असायची. वाजपेयी हे त्यांच्या नेहमीच्या संयमी आणि शांत पद्धतीने विरोधकांवर टीका करायचे. याउलट बाळासाहेब ठाकरे हे मात्र विरोधकांचे अक्षरक्ष: वस्त्रहरण करायचे. या दोघांच्या भाषण शैलीत फरक होता. त्या दोघांच्या स्वभावात एक साम्य होते. ते म्हणजे मनाचा उमदेपणा. विरोधकांना आपलेसे करेल असे वाजपेयींची ऋजु व्यक्तिमत्त्व होते. एरव्ही विरोधकांवर चौफेर हल्ला चढविणारे बाळासाहेब वैयक्तिक संबंधात अतिशय खुल्या मनाने वागत.

या दोघांमध्ये मतभेद झाले ते सुरेश प्रभू यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील नियुक्तीवरून. वाजपेयी यांच्या १९९९ च्या मंत्रिमंडळात प्रभू हे ऊर्जामंत्री होते. ते उत्तम काम करत असल्याचे वाजपेयी यांचे मत होते. मात्र प्रभू यांचा पक्ष संघटनेला फारसा उपयोग होत नसल्याचा बाळासाहेबांचा आक्षेप होता. वाजपेयी यांनी बाळासाहेबांचा शब्द राखत प्रभू यांचा राजीनामा घेतला.

लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसला एनडीएमध्ये सहभागी करून घ्यायचे की नाही, यावर खल सुरू होता. वाजपेयी आणि अडवाणी हे दोघे तेव्हा त्यासाठी अनुकूल असल्याचे तेव्हा प्रसिद्ध झाले होते. मात्र बाळासाहेब मात्र त्यास तयार नव्हते. तेव्हा वाजपेयी यांनी थेट अडवाणी यांना मुंबईमध्ये बाळासाहेबांची भेट घ्यायला पाठवले होते. अडवाणी आणि बाळासाहेबांमध्ये मुंबईच्या महापौर बंगल्यात या संदर्भात बैठक झाली होती. 

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांवर फोटो बायोग्राफी केली होती. त्याचे प्रकाशन वाजपेयी यांच्या हस्ते २००४ मध्ये मुंबईत गेट वे आॅफ इंडियाच्या प्रांगणात झाले होते. अनेक दिग्गज मंडळी या कार्य़क्रमाला उपस्थित होती. तेव्हा वाजपेयी हे पंतप्रधानपदाच्या पदावरून नुकतेच पायउतार झाले होते. भाजपप्रणित एनडीएचा पराभव त्या निवडणुकीत झाला होता. या कार्यक्रमात पराभवाची सल निघाली. बाळासाहेब म्हणाले की वाजपेयी यांचा बराच वेळ घटक पक्षांना सांभाळण्यात गेला. ममता, जयललिता, मायावती आदींनी त्यांना हैराण करून सोडले. त्यांना अधिक संधी मिळायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते,"बाळासाहेब ठाकरे हे जसे लोकप्रिय वक्ते आहेत. तसे लोकप्रिय लेखक आहेत. त्यांचे लिखाण आपण सगळे वाचत असतो. ते सामनामधून लिहितात. मात्र तेवढे पुरेसे नाही. माझी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी कादंबरी लिहावी. ही कादंबरी मराठी साहित्यातील अमर साहित्यकृती ठरेल.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण वाजपेयी आणि बाळासाहेब या दोघांच्या उपस्थितीत झाले होते. तो कार्यक्रमही गाजला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com