विलासरावांच्या प्रोत्साहानामुळे वैशालीताई रमल्या शेतात!

विलासरावांच्या प्रोत्साहानामुळे वैशालीताई रमल्या शेतात!

लातूर : मुले कर्तृत्ववान, घरात आराम, वैभवसंपन्न कुटुंब, नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवण्याचे वय असणाऱया एखाद्या घरातील गृहिणी फारसे शेतीकडे वळताना दिसत नाही. पण दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या अर्धांगिणी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख या मात्र याला अपवाद ठरल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून त्या शेतीत रमल्या आहेत.

विलासरावांपासून प्रेरणा घेतलेल्या वैशालीताई सध्या सेंद्रीय शेतीसोबतच एकरी दीडशे ते दोनशे टन ऊसाचे उत्पादन कसे घेता येईल असे वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांचे हे काम राज्यातील इतर महिलांसाठीही आदर्श ठरत आहेत. 

लोकनेते विलासराव देशमुख हे कुटुंबियाच्या बाबतीत नशीबवान. त्यांची आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, धीरज देशमुख हे तीनही मुले कर्तृत्वान निघाली. यामागे विलासरावांच्या अर्धांगिणी वैशालीताई देशमुख यांचे संस्कारही महत्वाचे होते. विलासराव मुख्यमंत्री असताना वैशालीताई त्यांच्यासोबत सावली सारख्या राहिल्या. वैशालीताईंचे माहेर आणि सासरचे कुटुंब वैभवशाली राहिलेले आहे. त्यामुळे शेती करणे हा विषयच नव्हता. पण मुख्यमंत्री असताना विलासरावांच्या प्रेरणेतून त्यांनी २००८ मध्ये सुरवातीला शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली.

पहिल्यांदा त्यांनी `साई` दूध डेअरी सुरु केली. काही म्हशी, गायी घेवून त्यांनी शेतात हा पहिला प्रयोग केला. तो यशस्वी ठरला. यातून दूध उत्पादकांना चांगला भावही त्यांनी दिला. त्यानंतर शेळ्या, कोंबड्याही त्यांनी पाळल्या. यातून कसे उत्पादन घेता येईल हे त्यांनी पाहिले.  २०१२ मध्ये विलासरावांचे निधन झाले. हा वैशालीताईंसाठी मोठा आघात होता. यातून त्यांनी स्वतःला आणि कुटुंबालाही सावरले. पुन्हा त्या शेतीकडे वळल्या. त्यात रमल्या.

त्यांनी बाभळगाव परिसरात असलेल्या शेतात सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरु केले. त्या शिस्तीच्या असल्याने शेतात कचरा दिसता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांची नोकरांना असते. हा सर्व गोळा केलेला कचरा, गीर आणि देशी गायीच्या गोमुत्रापासून त्या जीवामृत तयार करतात. इतकेच नव्हे तर त्यानी गांढूळ खत तयार करण्यासाठी वीस बेड तयार केले आहेत. या खताचा वापर पुन्हा शेतात
करून सेंद्रीय उत्पादन त्या घेत आहेत. त्यांनी उसाची उत्तम शेती करीत आहेत.

आपल्या शेतीमध्ये आधुनिक ऊस शेती केली आहे. या शिवाय शेड - नेटच्या माध्यमातूनही इतर अनेक उत्पादने त्या घेत आहेत. त्यांनी शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग विशेषतः ऊसशेती मध्ये केलेल्या उत्पादनाची दखल घेवून वसंतदाद शुगर इन्स्टिट्युटच्यावतीने त्यांचा ऊस भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. राज्याच्या उत्तरपूर्व विभागात सर्वसाधारणपणे हेक्टरी होणाऱ्या ऊस उत्पादनाच्या तुलनेत विक्रमी म्हणजे प्रति हेक्टरी ३२१.२१मेट्रीक टन ऊस उत्पादन त्यांनी घेतले आहे. यातून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

उसाच्या बाबतीत पश्मिच महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले आहेत. तसेच प्रयोग आपल्या भागात करता येतात का? याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. अनेकांचे त्या मार्गदर्शनही घेत आहेत. सध्या त्या एकरी दीडशे व दोनशे टन ऊसाचे उत्पादन घेण्याचा प्रयोग करीत आहेत. या सोबतच त्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या कुशल नियोजनामुळे या कारखान्याला नुकताच नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी त्याचे दिल्लीत वितरण होणार आहे. हॉलंड येथील शुगर केन सॉलीडरीडॅड व आरसीएफ कंपनीच्या शिष्टमंडळो काही दिवसापूर्वीच लातूर परिसरात शाश्वत ऊस विकासासाठी काय प्रयोग करता येतील याची वैशालीताईसोबत चर्चाही केली आहे.

खरं तरं वैशालीताईंचे वय हे नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवण्याचे आहे. पण त्या नातवंडाना सुद्धा आवर्जून शेतात घेवून कसे प्रयोग केले जात आहेत हे दाखवताना दिसून येतात. ``साहेबां`च्या प्रोत्साहानामुळे मी शेतीकडे वळले. आपल्या स्वतःच्या शेतात काम करायला काहीच लाज वाटण्याचे कारण नाही. शेती ही आपली आई आहे. तीच्याकडे तुम्ही जेवढे लक्ष द्याल, तेवढे ती तुम्हाला परत करीत असते. सेंद्रीय शेतीकडे लक्ष देत आहे. तसेच कमी क्षेत्रात कमी पाण्यावर जास्त उसाचे उत्पादन कसे घेता येईल याचा प्रयोग करीत आहे. निसर्गाने साथ दिली तर यात यश येईल असे वाटते, असे वैशालीताईंनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com