अठ्ठावीस वर्षानंतर माजी आमदार शिंदे यांनी स्वीकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अठ्ठावीस वर्षानंतर माजी आमदार शिंदे यांनी स्वीकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लातूर : कॉंग्रेसमधील स्पष्टवक्ते आणि ग्रामीण भागात फटकळ स्वभावाचे म्हणून ओळख असलेले माजी आमदार वैजनाथ शिंदे उर्फ दादा यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर दोन दिवसापूर्वी कार्यकर्ते व लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. किंबहून शुभेच्छा देण्यासाठी ते लोकांना सापडले. यातूनच कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचा सत्कार झाला. सत्कारप्रसंगी त्यांच्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा मिळाला. या आठवणींनी दादांना चांगलेच गहिवरून आले आणि पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांनी सत्काराला कसेबसे उत्तर दिले. 

ढोकी (ता. लातूर) येथील शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या दादांनी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वातून गावच्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत मजल मारली. 1982 मध्ये ते पहिल्यांदा गावचे सरपंच झाले. तब्बल दहा वर्ष ते गावचे सरपंच होते. याच काळात ते सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाले. त्या काळात ग्रामसेवकाच्या दफ्तराची पिशवी वागत सरपंचांना काम करावे लागत होते. ग्रामसेवक मंडळी सरपंचांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या नावावर रक्कम उचलून गैरव्यवहार करत आणि सरपंचांना कारागृहात जावे लागत होते. तेव्हा सरपंच पदासाठी आरक्षण नसल्याने लोकांच्या पसंतीच्या सरपंचांना सरकार दरबारी काहीच मान नव्हता. हा मान वाढवण्याचे काम दादांनी जिल्ह्यात केले. सरपंचांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारून त्यांची बाजू प्रशासनासमोर मांडली. यामुळे काही दिवसातच सरपंचांचा सरकार दरबारी दबदबा वाढला. त्यानंतर दादांनी पाच वर्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले. याच काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचेही संचालक होण्याचाही मान त्यांना मिळाला. 

दुसऱ्यांदा पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष सभापती होण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी पंचायत समितीचे कामकाज लोकाभिमुख केले. लोकांना विविध योजनांचा थेट लाभ देताना दलालांची फळी नष्ट करून लहानसहान कामासाठी चिरीमिरी घेण्याची पद्धत बंद केली. विकास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक तसेच विकास ऍग्रो इंडस्टीजचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर अस्तित्वात आलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होण्याची संधी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली. यातूनच विलासरावांचे तळागाळातील कार्यकर्त्यांवरील प्रेम ठळकपणे दिसून आले. आमदारकीच्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील लोकांचे लहानसहान प्रश्न सोडवले. 

मागील पंधरा वर्षापासून ते उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष असून ते सध्या ते बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कॉंग्रेसचे कार्यकर्ते असले तरी सर्वच राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्त्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन त्यांचे काम सुरू असते. सुरूवातीपासूनच त्यांना वाढदिवस साजरा करायला आवडत नाहीत. वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत बाहेरगावी निघून जाण्याचा त्यांचा फंडा होता. मात्र, मराठा आरक्षणासाठी घराशेजारी राहणारे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे त्यांना थांबावे लागले. आंदोलनात भाग घेऊन त्यांनी दिवसभर कार्यकर्ते व लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दूर अंतरावरून येऊन कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सायंकाळी बाजार समितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांचे सहकारी विक्रम शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचा राजकीय जीवनप्रवास उलगडून दाखवताना अनेक आठवणींना उजाळा दिला. यामुळे दादा चांगलेच गहिवरून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी गलबलून जातच त्यांनी सत्काराला उत्तर दिले. 

सरपंचांना जेवण अन्‌ ...! 
सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष असताना दादांनी सरपंचांना बैठकीला बोलावून त्यांना भोजन देण्याचे नियोजन केले. मात्र, त्यासाठी दादांकडे पैसे नव्हते. एकाने त्यासाठी मदत केली. दादांच्या निवडणुकीत मतदार यादी काढण्यापासून मतदार चिठ्ठयाचे वाटप करेपर्यंत अनेकांनी त्यांना मदत केली. एका सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी तसेच नेत्यांनी केलेल्या मदतीची दादांना जाणीव आहे. या जाणीवेनेच दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने गहिवरून आले. असे एक ना अनेक किस्से दादांनी मनाच्या कप्यात साठवून ठेवले आहेत. आपण सामान्य आहोत, हे सांगताना सामान्यांसाठी असलेली त्यांची तळमळ सर्वांनाच भावते. यामुळे प्रत्येक गोष्टीला जोडून शिव्यांची लाखोली वाहणारे दादा सर्वानाच आपले वाटतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com