vaidyanath suger | Sarkarnama

वैद्यनाथ कारखान्याचे पगार थकले ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

गेल्या अकरा महिन्यापासून या कारखान्यातील कामगार, कर्मचारी व मजुरांना पगार देण्यात आलेला नाही. पगार कधी मिळणार या बाबत कारखान्याचे संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी देखील मूग गिळून बसल्याने अनेक कर्मचारी कारखाना सोडून जात आहेत. कारखान्याच्या अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

परळी (जि. बीड) : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेल्या आणि सध्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी तालुक्‍यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे अकरा महिन्यापासून पगार थकले आहेत. पगार नसल्याने कारखान्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील असे मोघम उत्तर संचालक मंडळींकडून दिले जात आहे.

गेल्या 18 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने पंकजा मुंडे वैद्यनाथ कारखाना चालवण्यात अपयशी ठरल्या आहेत का? अशी चर्चा तालुक्‍यात सुरू झाली आहे. 

कारखान्याच्या उभारणीनंतर 1999-2000 या वर्षी पहिला गळीत हंगाम घेण्यात आला होता. साडेतीन हजार मेट्रीकटन ऊस गाळप क्षमता, 21 मेगावॅट वीजनिर्मिती व इथेनॉलचा प्रकल्प असलेल्या वैद्यनाथ कारखान्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आले होते. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे वैद्यनाथ कारखान्याचे नाव आशिया खंडात गाजले. तीव्र दुष्काळ, आर्थिक कोंडी, कर्ज अशा कारणांमुळे गेल्या कांही वर्षापासून वैद्यनाथ कारखाना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. उसाअभावी गेल्या वर्षी कारखान्याची चिमणीही पेटली नव्हती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख