पिचड-लहामटे यांच्या लढतीत तळपाडे कोणाला साथ देणार

अकोले विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी युतीकडून वैभव पिचड, आघाडीकडून राष्ट्रवादीचे डाॅ. किरण लहामटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आता पिचड यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण मागील दोन्ही निवडणुकीत तळपाडे यांना ५० हजाराच्या दरम्यान मते मिळाली आहेत. तळपाडे यांच्या भुमिकेमुळे राजकीय गणिते बदलणार आहेत.
Kiran Lahamate - Madhukar Talpade - Vaibhav Pichad
Kiran Lahamate - Madhukar Talpade - Vaibhav Pichad

नगर : अकोले विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी युतीकडून वैभव पिचड, आघाडीकडून राष्ट्रवादीचे डाॅ. किरण लहामटे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आता पिचड यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण मागील दोन्ही निवडणुकीत तळपाडे यांना ५० हजाराच्या दरम्यान मते मिळाली आहेत. तळपाडे यांच्या भुमिकेमुळे राजकीय गणिते बदलणार आहेत.

भाजप व शिवसेनेची युती झाल्यास तळपाडे यांच्यापुढे कोणाला मदत करायची, असा यक्ष प्रश्न उभा आहे. युती झाली नाही, तर शिवसेनेच्यावतीने त्यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र वरिष्ठ पातळीवर युतीचे संकेत आहेत. त्यामुळे तळपाडे आपल्या विरोधक असलेल्या पिचड यांच्या विरोधकांना मदत करणार, की पिचड यांच्याशी जुळवून घेणार, हे काळच ठरविणार आहे.

२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पिचड यांनी ६० हजार मते मिळवून बाजी मारली  होती. त्या वेळी शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना ५१ हजार मते मिळाली होती. केवळ नऊ हजार मतांचा फरक होता. त्यांनंतर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून वैभव पिचड यांनी ६७ हजार ६९४ मते मिळवून विजय मिळविला होता. या वेळी शिवसेनेच्या माध्यमातून तळपाडे यांना ४७ हजार ६४३ मते मिळाली होती. या शिवाय अकोले मतदारसंघात पिचड यांच्या रुपाने काँग्रेस-राष्ट्रवादीचेच कायम वर्चस्व राहिले आहे. तब्बल आठ पंचवार्षिक निवडणुकीत पिचड घराण्याकडे अकोले तालुक्याची सत्ता राहिली आहे. 

सध्या पिचड विरोधक एकत्र आले असले, तरी तळपाडे यांनी पिचड यांना मदत केल्यास विरोधकांचे काही चालणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु तळपाडे यांनी पिचड विरोधात भूमिका घेतल्यास विरोधकांना बळ मिळेल, आणि ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, अशीच शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बदलला
अकोले विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. १९७२ मध्ये काँग्रेसचे यशवंत भांगरे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर काँग्रेसच्या चिन्हावरच मधुकरराव पिचड आगामी चार निवडणुका जिंकले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर पिचड राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते तीन वेळा आमदार झाले. नंतर त्यांचे पूत्र वैभव पिचडही एकदा आमदार झाले. परंतु, पिचड आता भाजपमध्ये गेल्याने हा बालेकिल्ला बदलून युतीचा झाला.    

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय : तळपाडे
पारंपारिक विरोधक असलेले पिचड आता भाजपमध्ये आल्याने युती झाल्यास काय करावे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. युतीचे काय होते, याची वाट पाहत आहोत. युती झाल्यास काय भुमिका घ्यायची, हे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ठरविणार आहोत, असे शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com