अकोले तालुका फुलविण्यासाठी वैभव पिचड यांच्या हाती कमळ

अकोले तालुक्याचा विकास अधिक वेगाने करायचा, पर्यटन विकास वाढवायचे, धरणक्षेत्रातील लाभ मिळवून द्यायचा, निळवंडेचे अपूर्ण कामे मार्गी लावायचे, आदिवासींना लाभ मिळवून द्यायचा, एकूणच अकोले तालुका फुलवायचा, हेच उद्दिष्ट्य घेऊन वैभव पिचड यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा आमदार होण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
अकोले तालुका फुलविण्यासाठी वैभव पिचड यांच्या हाती कमळ

नगर : अकोले तालुक्याचा विकास अधिक वेगाने करायचा, पर्यटन विकास वाढवायचे, धरणक्षेत्रातील लाभ मिळवून द्यायचा, निळवंडेचे अपूर्ण कामे मार्गी लावायचे, आदिवासींना लाभ मिळवून द्यायचा, एकूणच अकोले तालुका फुलवायचा, हेच उद्दिष्ट्य घेऊन वैभव पिचड यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा आमदार होण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. लहानपणापासून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले असले, तरी ते घड्याळ आज बंद करून त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. गेल्या आठवडाभरात त्यांनी मुख्यमंत्री, तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्याचे वृत्त तालुक्यात धडकताच तालुक्यातील त्यांच्याविरोधकांनी आकांडतांडव सुरू केले. याकडे लक्ष न देता, त्यावर कोणतीही प्रतिक्रया न देता वैभव पिचड यांनी आपले लक्ष्य साध्य केले आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अकोले तालुक्‍यात सुरू केलेल्या विकासकामांचा डोलारा त्यांचे पुत्र वैभव पिचड समर्थपणे पेलवत आहेत. आदिवासींचे काम करताना पिचड यांनी दूरदृष्टी ठेवली. अकोले तालुका आदिवासींचे माहेरघर असलेला आहे. गड, किल्ले, धरणे, प्राचीन मंदिरे, निसर्गसौंदर्य सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यात पर्यटन वाढीसाठी पिचड कुटुंबियांनी कायम प्रयत्न केले. वैभव पिचड यांनी त्यासाठी नव्याने प्रयत्न करून आपल्या तालुक्याचा विकास हा पर्यटनाने अधिक होऊ शकतो, हे ओळखले. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने विविध योजना आणल्या. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पट्टा किल्ल्यावर त्याचे जुने रूप जतन करत विविध विकास कामे मार्गी लावली. कळसुबाई शिखराचे विद्युतीकरण, पर्यटन, वनपर्यटन, रंधा धबधबा, शिवसृष्टी, त्याचप्रमाणे रतनवाडी इको-फ्रेंडली स्वच्छतागृहे, सौर उर्जेचे दिवे, निसर्ग पर्यटकांसाठी आवश्यक असणारे उंच मनोरे, कोकणकड्यावर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, शिवकालीन टाक्यांची स्वच्छता, अशी सर्व कामे मार्गी लावण्यासाठी वैभव पिचड यांनी कायम पाठपुरावा केला. अकोले तालुका हा डोंगराळ परिसर आहे. त्यामुळे वनसंवर्धनाच्या कार्यक्रम आवश्यकच होता. अभयारण्य क्षेत्रात 76 लाख रुपये खर्च करून वनबंधाऱ्यांची निर्मिती करून या परिसराला अधिक फायदा मिळवून दिला. 

वन्यप्राण्यांबरोबरच परिसरालाही त्याचा लाभ होणार असल्याने ही विकासगंगा आणण्यात वैभव पिचड यांचे मोलाचे योगदान आहे. डोंगरावरील पाणी आढळा खोऱ्यात वळविण्याचा पथदर्शी प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांना यश आले. मुळा नदीवर 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पिंपळगाव खांड धरणाच्या ९५३ हेक्टर परिसर, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत 825 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल, अशी व्यवस्था आमदार पिचड यांनी केली.

कुटुंबातील सर्वांचे भाऊ
वैभव पिचड हे तालुक्यात भाऊ या नावाने ओळखले जातात. अचूक आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, विकासाची दूरदृष्टी हे वैभव  पिचड यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायची, रोज सोळा रोज 16 ते 17 तास काम करायचे, विरोधकांनी आरोप केले, तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष न देता काम करत करायचे हा भाऊंचा फंडा तालुक्यासाठी फायदेशीर ठरला. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, महासंघाचे संचालक, अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त, आदिवासी उजनी सेवा मंडळाचे विश्वस्त, अशा महत्त्वपूर्ण पदावर ते काम करीत आहेत. 

त्यामुळे पिचड यांचे कुटुंब म्हणजे या सर्व संस्थांचे कुटुंब बनले आहे.  वैभव पिचड यांचा वाढदिवस 27 एप्रिलचा. या दिवशी तालुक्यात विविध कार्यक्रम करून वाढदिवस साजरा केला जातो. वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मार्गदर्शन, आई हेमलता पिचड यांचा स्नेह आणि आणि सर्वच नागरिकांचे प्रेम यामुळे वैभव यांनी तालुक्यात विकास गंगा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच सर्वांचे भाऊ ही बिरुदावली त्यांना शोभते, असेच म्हणावे लागले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com