वाडा नगराध्यक्षपदासाठी उमेदवाराचा शोध! - Vada president election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

वाडा नगराध्यक्षपदासाठी उमेदवाराचा शोध!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नवनिर्वाचित वाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक आदिवासी आणि बिगरआदिवासी उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

वाडा : नवनिर्वाचित वाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक आदिवासी आणि बिगरआदिवासी उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
 
वाडा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होऊन येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वप्रथम जातीनिहाय प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 

नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य आणि एक नगराध्यक्ष असे एकूण 18 सदस्य आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती चार, नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच तर सर्वसाधारण सात असे जातीनिहाय आरक्षण पडले आहे. त्यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 

गुरुवारी (ता. 2) नगरविकास विभागाने नगराध्यक्षपदाची सोडत काढली. यात नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. वाडा शहरात सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्या 72 टक्के आहे. तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या 28 टक्के आहे. असे असताना नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण अथवा इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी अपेक्षित होते; मात्र अनुसूचित जमातीसाठी पडले. याला वाड्यातील भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तसेच न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

इच्छुकांची नाराजी 
आरक्षण पडण्यापूर्वी नगराध्यक्षपद सर्वसाधारण अथवा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असेल, अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. काहींनी वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात फलकबाजी केली होती. फलकबाजीतून संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती; मात्र हे आरक्षण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. 

नगराध्यक्षपदासाठी शोधाशोध 
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, ठाणे-पालघरचे विभागीय चिटणीस योगेश पाटील, शिवसेनेकडून उपतालुकाप्रमुख तुषार यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वैभव ठाकरे, कॉंग्रेसकडून तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, बहुजन विकास आघाडी अनंत सुवे आदी उमेदवार इच्छुक होते; मात्र अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी हे पद राखीव झाले. आता सर्व राजकीय पक्षांकडून सक्षम व तुल्यबळ उमेदवार मिळावा म्हणून शोधाशोध सुरू आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख