लोकसभा निवडणुकीसाठी मी सज्ज, पक्ष की अपक्ष ते वेळ आल्यावर ठरवेन - उत्तमसिंग पवार

लोकसभा निवडणुकीसाठी मी सज्ज, पक्ष की अपक्ष ते वेळ आल्यावर ठरवेन - उत्तमसिंग पवार

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणूक मी औरंगाबाद मतदारसंघातून लढवण्यास सज्ज आहे. धर्मनिरपेक्ष व सगळ्या जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबुत फळी माझ्याकडे आहे. शिवसेना-भाजप सोबत जाण्याचा प्रश्‍नच नसल्याने इतर राजकीय पक्षांनी आता निवडून येईल असा उमेदवार कोण याचा विचार करावा. मी निवडूणक लढवणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता कुठल्या पक्षाकडून की अपक्ष हे मी योग्य वेळ आल्यावर ठरवेन असे सांगत माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेणार असल्याचे सरकारनामाशी बोलतांना स्पष्ट केले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपने युतीची वाट न पाहता स्वतंत्रपणे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून आगामी निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. आघाडीत कॉंग्रेसकडे असलेली औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडा असा मतप्रवाह आहे. मात्र कॉंग्रेसने औरंगाबादची जागा आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा दावा केला आहे. 

एकीकडे राज्यातील प्रमुख पक्षांची गोळाबेरीज सुरू असतांनाच नव्याने उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएमने देखील उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर दोनदा खासदार झालेल्या उत्तमसिंग पवार यांनी आगामी लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे सांगून या निवडणुकीत आणखीणच रंगत आणली आहे. 

या संदर्भात बोलतांना उत्तमसिंग पवार म्हणाले, मला चार लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. पैकी 96 आणि 98 मध्ये मी दोनदा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झालो होतो. जातीयवादी किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला सोबत घेऊन निवडणूका जिंकता येत नसतात. मुळात मी लहानपणापासूनच धर्मनिरपेक्ष विचारांचा असल्यामुळे मला सगळ्याच जाती-धर्मांच्या लोकांची साथ मिळाली. या जोरावरच आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा मानस आहे. 

कॉंग्रेस, वंचित आघाडी की अपक्ष? 
उत्तमसिंग पवार यांनी शिवसेना-भाजप सोबत जाणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये औरंगाबाद लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे असली तरी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने पराभव होत असल्याने यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ही माहिती औरंगाबाद दौऱ्यात दिली होती. पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव घेत आमच्याकडे उमेदवार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. 

दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी औरंगाबादची जागा कॉंग्रेसच लढवणार असे ठामपणे सांगत या चर्चेला पुर्ण विराम दिला आहे. कॉंग्रेसकडून आमदार सुभाष झांबड यांच्या नावाची चर्चा असली तरी ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत कॉंग्रेस अनपेक्षित नाव पुढे करू शकते असे बोलले जाते. त्यामुळे ते अनपेक्षित नाव माजी खासदार उत्तमसिंग पवार यांचेही असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. 

या शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पर्यायांचा विचार देखील उत्तमसिंग पवार यांच्याकडून केला जाऊ शकतो. तुर्तास या सर्व शक्‍यतांवर उत्तमसिंग पवार यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवत " वेट ऍन्ड वॉच' ची भूमिका स्वीकारली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com