कोरोनाचे मृत्यू अमेरिकेत सर्वाधिक; इटलीस टाकले मागे : डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप

जगभरात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून बाधितांच्या संख्येमध्येही झपाट्याने वाढ होते आहे.
donald trump.
donald trump.

न्यूयॉर्क : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता जागतिक महासत्ता असणारी अमेरिकाही घायकुतीला आली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वीस हजारांच्याही पुढे गेली असून हे प्रमाण इटलीपेक्षाही अधिक असल्याचे जॉन हापकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत अमेरिका सर्वांत पुढे गेली असून याला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाइम्स'ने केला आहे. ट्रम्प यांना देशातील वैद्यकीय अधिकारी, गुप्तचर अधिकारी यांनी जानेवारीच्या सुरवातीलाच संसर्ग पसरण्याची कल्पना दिली होती, मात्र त्याऐवजी अर्थव्यवस्थेकडे अधिक लक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई याकडे ट्रम्प यांचा ओढा होता, असा दावा करण्यात आला आहे.

चीनमध्ये संसर्ग पसरण्यास सुरवात होताच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषाणूचे गांभीर्य सांगत तत्काळ हालचाली करण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी या माहितीला फारसे महत्त्व दिले नाही. अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद, नियोजनाचा अभाव आणि आपल्या आतल्या आवाजावर ट्रम्प यांचाच विश्वास नसणे, यामुळे अमेरिकेने संसर्गाच्या सुरुवातीच्या काळातले महत्त्वाचे तीन आठवडे वाया घालवले, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. शिवाय, ट्रम्प यांच्याभोवती दोन परस्पर विरोधी मते असलेल्या गटांचा गराडा असल्याने निर्णय घेण्यात आणि त्याच्या अंमलबजावणीत विलंब लागत आहे. अमेरिकेत एकूण साडे पाच लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून २१ हजार जणांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे.

दरम्यान जगभरात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून बाधितांच्या संख्येमध्येही झपाट्याने वाढ होते आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मात्र तातडीने लॉकडाउन मागे घेणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. इराणने मात्र राजधानी तेहरान बाहेरील उद्योग सुरू केले असून सौदी अरेबिया आणि अरमेनियामधील लॉकडाउन मात्र कायम आहे. विशेष म्हणजे स्पेनमधील मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

अमेरिकी युद्धनौकेवरील दहा टक्के जणांना बाधा
वॉशिग्टन : अमेरिकी नौदलाच्या यूएसएस टी. रूझवेल्ट या विमानवाहू नौकेवरील चार हजार ८०० कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या कोरोनाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, असे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या उद्रेकानंतरची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. यूएसएस टी. रूझवेल्ट या विमानवाहू नौकेवरील ९२ टक्के जवानांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५५० जण पॉझिटिव्ह आढळून आले असून, ३,६७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती अमेरिकी नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

फ्रान्समध्ये मृतांच्या संख्येत घट

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाच्या विषाणूमुळे एका दिवसात झालेल्या मृत्यूच्या संख्येत शनिवारी घट नोंदविण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. फ्रान्सचे आरोग्य विभागाचे अधिकारी जेरोम सालोमन यांनी सांगितले की, शनिवारी एकूण ६४३ मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनामुळे फ्रान्समध्ये झालेल्या मृत्यूची संख्या १३,८३२ वर पोहचली आहे. शुक्रवारी ९८७ जणांचा मृत्यू झाला होता.

चीनमध्ये नव्याने शंभर रुग्ण आढळले
बीजिंग : चीनमध्ये कोरोनाची बाधा झालेले ९९ रुग्ण शनिवारी आढळून आले. मागील काही आठवड्यात चीनमधील एका दिवसांतील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. कोरोनाच्या साथीची दुसरी लाट चीनमध्ये येण्याची शक्यता आरोग्य आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी विदेशातून चीनमध्ये आलेल्या रुग्णांची संख्या १,२८० वर पोहचली आहे. त्यापैकी ४८१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, ७९९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे. चीनमध्ये शनिवारी कोरोनाचे ९९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ९७ जण हे विदेशातून परतले आहेत. कुठलीही लक्षणे नसलेले ६३ नवे रुग्ण आढळून आले असून, त्या पैकी १२ जण विदेशातून परतले आहेत.

द. कोरियात नव्या रुग्णांच्या संख्येत घट
सोल ः दक्षिण कोरियात मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे ३२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून आज देण्यात आली. कोरोनाची नव्याने बाधा होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दक्षिण कोरियात मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचेही सांगण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com