Unrest against Khair - Shirsat among shiv sena corporaters | Sarkarnama

खैरे - शिरसाटांविरोधात शिवसेना नगरसेवकात असंतोष

जगदीश पानसरे
रविवार, 30 एप्रिल 2017

स्थायीतील नियुक्तीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झाले असून मातोश्रीवर कैफियत ऐकूण घेतली नाही तर पक्षातील नाराज नगरसेवकांचा एक गट भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्‍यता आहे. ज्याचा परिणाम ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या
महापौरपदाच्या निवडणुकीवेळी दिसून येईल.

औरंगाबाद: महापालिकेतील स्थीयी समिती सदस्यपदी खासदार चंद्रकांत खैरे व पश्‍चिमचे आमदार संजय सिरसाट यांनी अनुक्रमे ऋषीकेश व सिध्दांत या आपल्या पुुत्रांची वर्णी लावत  घराणेशाहीची  आणल्याने  शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये
अस्वस्थता व खदखद आहे. 

याचा भडका कोणत्याही क्षणी उडू शकतो अशी परिस्थीती असून नाराज नगरसेवकांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्फत मातोश्री गाठण्याचा विचार बोलून दाखवला आहे. पण खासदार, आमदार यांचे मातोश्रीवरील वजन  आणि मातोश्रीवर देखील रुजलेली घराणेशाही पाहता या नगरसेवकांची तक्रार किंवा गाऱ्हाणे कितपत ऐकले जाईल, त्यांना मोठ्या साहेंबाची भेट मिळेल की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

महापालिकेच्या राजकारणात एकीकडे भाजप शिवसेनेला दिवसेंदिवस वरचढ ठरत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतील नेते मात्र आपला हेका आणि घराणेशाही सोडायला तयार
नसल्याचे आता शिवसैनिक उघडपणे बोलायला लागले आहेत.

 शिवसेनेकडून ज्या पाच सदस्यांच्या नावांचा बंद लखोटा महापौराकडे पाठवण्यात आला त्यात ऋषीकेश खैरे, सिध्दांत सिरसाट या खासदार, आमदार पुत्रांसोबतच पुर्वचे शहरप्रमुख नगरसेवक राजू वैद्य व दोन अपक्षांची नावे  होती. महापौरपदासाठी शिवसेनेला मदत करणाऱ्या दोन अपक्षांच्या नियुक्तीवर कुणालाही आक्षेप नाही. परंतु खासदार, आमदारांच्या मुलांसह शहरप्रमुखपद असलेल्या राजू वैद्य यांना अनेकदा पदे देवून देखील पुन्हा स्थायीमध्ये स्थान का? असा सवाल शिवसेनेचे नाराज नगरसेवक करत आहेत.

शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा

स्थायीतील नियुक्तीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झाले असून मातोश्रीवर कैफियत ऐकूण घेतली नाही तर पक्षातील नाराज नगरसेवकांचा एक गट भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्‍यता आहे. ज्याचा परिणाम ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या
महापौरपदाच्या निवडणुकीवेळी दिसून येईल.

 एकीकडे भाजपने शिवसेनेतून आलेल्या गजानन बारवाल यांच्यासाठी कैलासगायकवाडया भाजपच्या पाठिंब्यावर स्थायी मध्ये गेलेल्या नगरसेवकाला एकवर्ष आधीच स्वेच्छा निवृत्ती घ्यायाला भाग पाडले आणि त्या जागेवर बारवाल यांची नियुक्ती करत शब्द पाळला. भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा उचित सन्मान राखला जातो हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिला आहे. 

भाजपात प्रवेश करते वेळी बारवाल यांना स्थायी समितीचे सभापदीपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. तो पुर्ण करण्यासाठी भाजपने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जाते. एकीकडे भाजप शिवसेना व इतर पक्षातील पदाधिकारी,
कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन शहरात पक्षाची ताकद वाढवत आहे, तर दुसरीकडेशिवसेनेचे नेते पक्षा पेक्षा पुत्र प्रेम आणि घराणेशाहीलाच प्राधान्य देतांना दिसत आहेत. भविष्यात याचा फटका शिवसेनेला बसू शकतो.

पुढील अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे. ओबीसीसाठी राखीव असलेल्या या पदावर आपल्या मुलांची वर्णी लागू शकत नाही हे लक्षात आल्यावर महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायीमध्ये एन्ट्री मिळवत खासदार खैरे व आमदार सिरसाट यांनी आपले वर्चस्व राखत दुधाची तहान ताकावर भागवल्याची चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख