Uncertainty About Candidates in Ramtek | Sarkarnama

रामटेकसाठी युतीसह आघाडीचाही उमेदवार ठरेना

विजयकुमार राऊत
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

युती झाल्यास रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचा किंवा भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. अशीच परिस्थिती कॉंग्रेसची आहे.

नागपूर : युती झाल्यास रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचा किंवा भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. अशीच परिस्थिती कॉंग्रेसची आहे. या पक्षातील अमोल देशमुख, राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे, उदयसिंग (गज्जू) यादव यांच्यासह दीपक पालिवाल हेदेखील उमेदवारीसाठी पक्षाकडे 'जॅक' लावत आहेत. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांच्या गाडीवर पुन्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा लावल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.

माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख मागील पाच वर्षांपासून रामटेकमध्ये काम करीत आहेत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही कामाला सुरुवात केल्याने कॉंग्रेसमध्ये गट पडले. पेंच नदीत मध्य प्रदेशातील चौराई तालुक्‍यात बांधण्यात आलेल्या मागचोरा धरणातून पाणी सोडण्यासाठी गज्जू यादव व चंद्रपाल चौकसे यांनी मध्य प्रदेश सरकारकडे केलेली शिष्टाई राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. राजेंद्र मुळक यांनी रामटेकमध्ये जनसंपर्क कमी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, अमोल देशमुख हे उमेदवारी मलाच मिळणार, असा दावा करीत आहेत. मुळक यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवर भर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा कडवा विरोध केला आहे. भाजपने घेतलेल्या मुलाखतीवेळी आमदार रेड्डी उपस्थित नसल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, भाजपमधून अविनाश खळतकर, कमलाकर मेंघर यांनी दावेदारी केली आहे. रेड्डी यांनी त्यांच्या गाडीवर पुन्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा फडकावला असून, त्यांनी वेगळाच संदेश दिला आहे. शिवसेनेमधून माजी आमदार अॅड. आशीष जयस्वाल यांचा दावा मजबूत असला, तरी अद्याप युतीची कोणतीही चर्चा नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. 

भाजप नेत्यांशी आशीष जयस्वाल यांचे चांगले संबंध असल्याने तेच उमेदवार राहतील, अशीही सर्वाधिक शक्‍यता वर्तविली जात आहे. पारशिवनी तालुका रामटेक मतदारसंघातून वेगळा करून सावनेर मतदारसंघाला जोडला होता. आता तो पुन्हा रामटेकला जोडण्यात आला आहे. यामुळे येथील नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या वेळी उमेदवारीत पारशिवनीला झुकते माप द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

स्थानिकांचा मुद्दा ऐरणीवर
कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी स्थानिकांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. यामागे कुणाची खेळी होती, हे स्पष्ट होऊ शेकले नाही. असे असले तरी चंद्रपाल चौकसे व उदयसिंग यादव यांच्या नावांची चर्चा जोरात आहे. पारशिवनी तालुक्‍यातील सर्वसाधारण कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष दीपक पालिवाल यांनी केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख