umesh endait suicide in aurangabad | Sarkarnama

मराठा आहे म्हणून की काय?... उमेश एंडाईतने गळफास घेतला 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

उमेशचे वडील चिकलठाण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. येथील चौधरी कॉलनीत त्यांचे घर असून ते मूळचे गोलटगाव, (वडाची वाडी, ता. बदनापूर) येथील रहिवासी आहेत. उमेशला मोठा भाऊ व एक लहान बहीण असून आई शेतीकाम करते. 

औरंगाबाद : "मी आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करु शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहीलं, बीएस्सी होऊनही नोकरी नाही. मी मराठा आहे म्हणून की काय? अशी चिठ्ठी लिहीत नोकरी मिळत नसलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकलठाणा भागात घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आसाराम एंडाईत (वय 22, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने बी. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. नुकतीच त्याने एम.एसस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्वपरिक्षा दिली होती. अनेक महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता. 

दोन कन्सलटन्सीकडे नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेशने कंपन्यांमध्ये मुलाखतीही दिल्या. गेल्या काही दिवसांपासून तो आजारीही होता. आज अचानक उमेशने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलीसांना उमेशने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. घाटी रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री नऊ वाजता चिकलठाणा येथील स्मशानभूमीत उमेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेंद्रा येथे एका कंपनीत मुलाखतीसाठी उमेश गुरुवारी सायंकाळी चार वाजता जाणार होता. ही बाब त्याने दुपारी कुटुंबियांना सांगितली. बरे नसल्याने त्याने औषधी घेतली. ""आता झोपतो, मला चारच्या आधी उठवा'' असे सांगून तो घरातील एका खोलीत गेला. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

उमेशने आत्महत्या केल्याची माहिती कळताच चिकलठाणा भागात तरूण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जालन्याकडे जाणारा रस्ता रोखून धरला होता. तर काहीजणांनी दगडफेक करत रस्त्यावर टायर जाळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख