Ulhasnagar ShivSena leaders oppose Omi Kalani | Sarkarnama

उल्हासनगरातील शिवसैनिकांचे कलानींविरुद्ध एकनाथ शिंदेंना साकडे 

दिनेश गोगी
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

ओमी कलानी आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या मातोश्री राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार म्हणून 2014 मध्ये निवडून आलेल्या आहेत. तर ओमी यांच्या  पत्नी भाजपतर्फे शहराच्या महापौर आहेत . पण भाजपतर्फे उमेदवारी मिळविणे अवघड असल्याने ओमी कलानी यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न चालवले आहेत. 

उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत पप्पू कालानी पुत्र ओमी कालानी शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा रंगात आली असताना शिवसेनेतील एका गटाने त्यास तीव्र विरोध सुरु केला आहे . 

 आज,शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांनी ओमी कालानी यांच्या पक्षप्रवेशाला प्रखर विरोध करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात धाव घेतली .

ओमी कालानी यांची स्वतंत्र टीम आहे. भाजपात त्यांच्या टीमच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यांच्या पत्नी पंचम कालानी ह्या भाजपाच्याच महापौर आहेत. मात्र ओमी यांनी भाजपा ऐवजी त्यांची टीम वाढवण्याला प्राधान्य दिले आहे.

जर शिवसेनेने ओमी यांना प्रवेश दिल्यास हीच परिस्थिती शिवसेनेची होऊ शकते .  ओमी कलानी  शिवसेनेला पोखरून त्यांची टीम मजबूत करण्यावरच लक्ष केंद्रित करणार असे गार्हाणे या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडले . 

पप्पू कलानी यांच्या कारकीर्दीत  त्यांनी शिवसेनेशी संघर्षच केला होता .  त्यामुळे ओमी कलानी यांना पक्षात प्रवेश नाकारण्यात यावा तसेच  निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी  देण्यात यावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, नगरसेवक कलवंतसिंग सोहता, स्वप्निल बागुल, संघटक सागर उटवाल, विभाग प्रमुख शिवाजी जावळे,मनोहर बेहनवाल, महेंद्र पाटिल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख