उल्हासनगरात भाजपचा बहुमत असूनही पुन्हा पराभव 

मतदानाला एक तासापूर्वी शहीद जनरल अरुण कुमार वैद्य (टाऊन) हॉल मध्ये नेत्यांची आणि परिवहनच्या सदस्यांची मीटिंग सुरु होती. या मीटिंग मधून परिवहन सदस्य राजकुमार सिंह यांनी पळ काढला. पालिकेत मतदानाच्या वेळेही राजकुमार फिरकलेच नाही.
kalani and others
kalani and others

उल्हासनगर  : महाविकास आघाडी तसेच भाजपा यांच्यात समान सदस्यसंख्या आणि स्थायी समिती सभापतीचे मत हे भाजपाचेच असल्याने उल्हासनगर पालिका परिवहन सेवा सभापती पदावर भाजपाचाच विजय होणार आणि महापौर-उपमहापौर निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला जाणार अशा आणाभाका हाकल्या जात होत्या. 

मात्र मतदानाला अवघा एक तास राहिला असतानाच भाजपाच्या एका सदस्याने पळ काढल्याने सम-समान संख्याबळ झाल्यावर काढण्यात आलेल्या चिट्ठीत महाविकास आघाडीतील ओमी कालानी टिमचे दिनेश लहरानी यांना कौल मिळाल्याने ते विजयी झाले आणि भाजपाचे शंकर दावानी यांचा पराभव झाल्याने भाजपाला झटका बसला आहे.

मागच्या महिन्यात शिवसेना-टीओके-राष्ट्रवादी-रिपाइ-कॉंग्रेस-पीआरपी हे एकवटल्याने अवघ्या अडीच वर्षात भाजपा-साईपक्षा वर सत्ताउतार होण्याची नामुश्की ओढावली होती.परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाकडे 6 आणि टीओके- शिवसेना-रिपाइ यांचे ही 6 सदस्य आहेत. त्यात निर्णायक असणारे स्थायी समिती सभापती राजेश वधारिया हे भाजपाचेच असल्याने भाजपाला त्यांचा विजय डोळ्या समोर दिसत होता.

परिवहन सभापतीसाठी भाजपाच्या वतीने शंकर दावानी आणि शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाइ यांच्या सोबत महाविकास आघाडीत असलेले टीम ओमी कालानी च्या वतीने दिनेश लहरानी यांच्यात आमना-सामना होता. मागच्या वर्षी शंकर दावानी हे राष्ट्रवादी कडून परिवहन सदस्य झाले होते.त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाने त्यांना सभापतीच्या रिंगणात उतरवले होतेे.7 विरुद्ध 6 असे संख्याबळ निवडणूक असली तरी टीओकेच्या वतीने मतांची फोडाफोडी होते काय?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

.... आणि भाजपाच्या सदस्याने पळ काढला

मतदानाला एक तासापूर्वी शहीद जनरल अरुण कुमार वैद्य (टाऊन) हॉल मध्ये नेत्यांची आणि परिवहनच्या सदस्यांची मीटिंग सुरु होती. या मीटिंग मधून परिवहन सदस्य राजकुमार सिंह यांनी पळ काढला. पालिकेत मतदानाच्या वेळेही राजकुमार फिरकलेच नाही.राजकुमार यांना गैरहजर ठेवण्यासाठी किंबहुना त्यांचे मत फोडण्यामागे टीओकेचे संतोष पांडे, अजित माखीजानी, दीपक छतलानी यांनी भूमिका निभावल्याचे बोलले जाते. 

राजकुमार गैरहजर राहिल्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी यांचे सदस्य संख्याबळ झाल्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी चिठ्ठी काढली.त्यात महाविकास आघाडीतील टीम ओमी कालानीचे दिनेश लहरानी यांचे नाव निघाल्यावर त्यांना परिवहन सभापती घोषित करण्यात आले. 

महापौर लिलाबाई आशान, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ओमी कालानी, उपशहरप्रमुख अरुण आशान, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, टीओकेचे सुमित चक्रवर्ती, अजित माखीजानी, संतोष पांडे, दीपक छतलानी,  कमलेश निकम, पंकज त्रिलोकानी, मनीष हिंगोरानी, अशोक बजाज, सुंदर मुदलियार आदिंनी नवनिर्वाचित सभापती दिनेश लहरानी यांचे अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com