Vilasrao_deshmukh_Ulhasdada
Vilasrao_deshmukh_Ulhasdada

विलासराव मुंबईतील पुराच्यावेळी अहोरात्र जागे होते : उल्हास पवार

.

लातूर : राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना विलासरावांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले; पण स्वत:ची टिमकी त्यांनी कधी वाजवली नाही. ‘हे मी केलं’ असा गर्वही त्यांना कधी बाळगला नाही. कारण अहंकाराचा वारा त्यांना कधी लागलाच नाही. सत्तेची अभिलाषाही बाळगली नाही. ते खरे कर्मयोगी होते, अशा भावना विलासरावांचे जीवलग मित्र, माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केल्या.

दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ब्रीजलाल कदम-पाटील लिखित 'विलासपर्व' या ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार यांनी एखाद्याची फिरकी घेण्याची विलासरावांची सवय, त्यांच्यातील हजरजबाबीपणा, त्यांची वक्तृत्वशैली, विविध विषयांचा अभ्यास असे वेगवेगळे पैलू आपल्या भाषणातून उलगडले. या वेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी प्राचार्य सोमनाथ रोडे, आमदार त्र्यंबक भिसे, विनायकराव कदम-पाटील उपस्थित होते. 

उल्हास पवार म्हणाले, विलासराव हे सतत लोकांमध्ये राहणारे नेते होते. त्यामुळे त्यांना कधी सकाळची नाष्टा नीट करता आला नाही. तर कधी दुपारचे जेवण करता यायचे नाही. इतका त्यांचा लोकांमध्ये वावर असायचा. लोकांच्या दुख:शी ते एकरूप व्हायचे. या सगळ्या व्यापात त्यांनी स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना आजाराशी सामना करावा लागला. ते असते तर आज मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते. २००५मध्ये आलेल्या पुरावेळी ते रात्रंदिवस जागे होते. स्वत: ते रस्त्यावर उतरले होते. मंत्र्यांना पुराच्या ठिकाणी पाठवले होते. जबरदस्त आकलन शक्ती, दूरदृष्टी, प्रशासनाला हाताळण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळे अध्यादेश लगेच निघायचा. आताचे सरकार दिवसामागून अध्यादेशासाठी दिवस घालवते.

हॉटेलात सूप अन् घरी जेवण

मी विलासरावांसोबत सावलीसारखा वावरलो आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मला जवळून अनुभवता आले. त्यांना एकेदिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर ते घरी जातील, रागाला येतील असे वाटत होते; पण ते तर एका जाहीर कार्यक्रमाला गेले. चेहऱ्यावर कसलाही ताण नव्हता. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. सत्तेची अभिलाषा त्यांनी कधी बाळगली नाही. हे मी अनेकदा अनुभवले आहे, असे पवार यांनी सांगितले. पंचतारांकित हॉटेलातील जेवण त्यांना आवडायचे नाही. तिथे फक्त ते सूप प्यायचे आणि बोलावणारा नाराज होऊ नये म्हणून जेवलो असल्याचा आव आणायचे. घरी जाऊन भाकरी, चटणी, लोणचे, भाजी जेवायचे, अशा आठवणीही त्यांनी सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com