udyanraje supporter demmands about shalinitai | Sarkarnama

चुकीची दुरुस्ती करा,शालिनीताईंना कोरेगावातून बिनविरोध द्या!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

खासदार उदयनराजे भोसले व शालिनीताई पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

सातारा : मराठा आरक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांना राजकीय विजनवासात जावे लागले. आता सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाचा सन्मान म्हणून शालिनीताई पाटील यांना कोरेगाव मतदारसंघातून बिनविरोध निवडून द्यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक रवी साळुंखे यांनी केली आहे. 

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात रवी साळुंखे यांनी म्हटले की, शालिनीताई पाटील यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव राहिला. खासदार उदयनराजे भोसले व शालिनीताई पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कोरेगावची जनता जेवढी शालिनीताईंवर प्रेम करते तेवढीच उदयनराजेंवर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शालिनीताईंनी महाराष्ट्रभर रान पेटवले. तेव्हाही अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला. त्या काळात केवळ उदयनराजे त्यांच्या सोबत राहिले.

शालिनीताईंनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली म्हणून त्यांना राष्ट्रवादीतून काढून टाकले. पैसा व सत्तेच्या जोरावर मनगटशाही करुन त्यांचा कोरेगाव मतदारसंघात पराभव केला. आज इतक्‍या वर्षानंतर पुन्हा एकदा शालिनीताईंचेच म्हणणे खरे ठरले आहे. मात्र, शालिनीताईंना राजकीय किंमत चुकवावी लागली.

या चुकीची दुरुस्ती करायची असेल तर त्यांना सन्मानाने कोरेगाव मतदारसंघात बोलवावे लागेल. त्यासाठी या आरक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या शालिनीताई पाटील यांनाही अखेरची संधी म्हणून बिनविरोध निवडून द्यावे आणि त्यांचा राजकीय सन्मान करावा, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख