udyanraje-shashikant shinde hug in satara collector office | Sarkarnama

उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंना जोरात धक्‍का दिला, मग मिठी मारली!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

काही महिन्यांपासून खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. यापार्श्‍वभूमीवर उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांची हास्यविनोदी भेट चर्चेची ठरली आहे.

सातारा : संसदेतील मोदी अन्‌ राहूल गांधींची मिठी त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का मारून मारलेली मिठी या दोनच मिठ्या लोक लक्षात ठेवतील, असे मिश्‍किलपणे खासदार उदयनराजे भोसले म्हणताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच हशा पिकला. 

महाबळेश्‍वर येथील हरित लवादाच्या वॉरंट संदर्भात आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. सुरवातीला उदयनराजे आले व थोड्यावेळानी आमदार शशिकांत शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात आले.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उदयनराजे हे महाबळेश्‍वरच्या ठराविक लोकांसोबत बसले होते. आता आतमध्ये कोणालाही सोडू नका, असे त्यांनी सांगितले होते. त्याच वेळी आमदार शशिकांत शिंदे दालनाबाहेर आले. त्यावेळी त्यांना आतमध्ये तुमचे खासदार बसले आहेत, असे सांगण्यात आले. त्यावर आमदार शिंदेंनी आम्हीपण कामासाठीच आलोय, असे सांगून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. 

ही बैठक संपल्यानंतर शशिकांत शिंदे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आले व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांशी बोलत उभे होते. त्यावेळी खासदार उदयनराजे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमधून बाहेर येऊन थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनकडे आले. पण पुढे जाताना उदयनराजेंनी पाठमोरे उभे असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना जोरात धक्का मारला. यावर आरे कोण आहे...आरे तुम्ही आहे होय...असे म्हणत उदयनराजेंनीच हसतच आमदार शशिकांत शिंदेंना मिठी मारली. यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांत एकच हशा पिकला. काहींनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. यावर उदयनराजे म्हणाले, दोनच मिठ्या लक्षात राहितील, एक संसदेतील आणि दुसरी जिल्हाधिकारी कार्यालयातील ही मिठी. असे म्हणत दोघेही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख