udyanraje politics | Sarkarnama

उदयनराजेंची "शांती मे क्रांती'! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 28 मार्च 2017

राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंविरोधातील कोणतीही संधी सोडत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी मात्र, सावध पवित्रा घेत थेट पक्षश्रेष्ठींशी संपर्क ठेवत "शांती मे क्रांती' अशी भूमिका घेतली आहे. 

सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे मनसुबे धुळीला मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. ते उदयनराजेंविरोधातील कोणतीही संधी सोडत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी मात्र, सावध पवित्रा घेत थेट पक्षश्रेष्ठींशी संपर्क ठेवत "शांती मे क्रांती' अशी भूमिका घेतली आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदारांविनाच निवडणूक लढण्याची रणनीती आखली. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नेते एकजुटीने लढले. त्यामुळे 40 जागांवर विजय मिळविता आला. हा विजय मिळविताना खासदार उदयनराजेंचे मनसुबे धुळीला मिळविण्यात पक्षाचे नेते यशस्वी ठरले.

आता संधी मिळेल तिथे खासदार व त्यांच्या समर्थकांचा समाचार घेण्यातही पक्षातील नेते मंडळी मागे पुढे पाहात नाहीत. राष्ट्रवादीची नेतेमंडळी खासदारांविरोधात आक्रमक झालेली असतानाच उदयनराजे मात्र, शांतपणे सर्वकाही पहात आहेत. त्यांनी कोठेही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले आहे. उलट ते पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांशी संपर्क ठेवून आहेत. उदयनराजेंकडून काहीतरी प्रतिउत्तर येण्याची वाट सर्वजण पहात आहेत. पण खासदारांनी शांती मे क्रांती अशीच भूमिका ठेवली आहे. कदाचित ही त्यांची शांत भूमिका आगामी धोक्‍याची चाहूल तर नाही ना, अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख