खंडणी प्रकरणातून राजे सहीसलामत सुटले!

कामगारांचे पैसे द्या, असे उदयनराजे म्हणाले होते. त्याचा राग आल्याने खोटी तक्रार दिली आहे. राजकीय विरोधकांनी गैरफायदा घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तिवाद मांडण्यात आला होता.
udyanraje acquit from extortion case
udyanraje acquit from extortion case

सातारा : लोणंद (ता. खंडाळा) येथील एका कंपनीच्या व्यवस्थापन व मालकास खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची आज जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

लोणंदस्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी खंडणी देत नाही म्हणून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणंद शहर पोलिसांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी उदयनराजे यांचे खासगी सचिव अशोक सावंत यांच्यासह नऊ जणांना अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. यामध्ये अशोक कांतिलाल सावंत (वय 46, रा. यशवंतनगर, अकलूज), रणजित अमृत माने (वय 33, रा. साखरवाडी, फलटण), राजकुमार कृष्णात गायकवाड (वय 25, रा. होळ, ता. फलटण), सुकुमार सावता रासकर (वय 32, बाजारतळ, लोणंद), धनाजी नामदेव धायगुडे (वय 32, रा. पाडळी, खंडाळा), ज्ञानेश्‍वर दिलीप कांबळे (वय 29, रा. होळ), योगेश भुजंग बांदल (वय 30, रा. होळ), महेश अप्पा वाघुले (वय 25, रा. माळ आळी, लोणंद) व अविनाश दत्तात्रय सोनवले (वय 28, रा. कोळकी, फलटण) अशी संबंधित संशयितांची नावे होती. 

उदयनराजेंसह एकूण दहा जणांविरुद्ध गर्दी, मारामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी स्वीकारणे, खंडणीसाठी मारहाण करणे, शिवीगाळ- दमदाटी करणे व जीवे मारण्याची भीती घालणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. आज झालेल्या निकालात उदयनराजेंसह दहा जणांची जिल्हा न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी आज निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षातर्फे ऍड. धैर्यशील पाटील व ताहेर मणेर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. कंपनीत 1200 ते 1300 कामगार काम करत असताना कंपनी तीन महिने बंद होती. कंपनीत कामगार व व्यवस्थापनात संघर्ष सुरू आहे. कथित मारहाणीनंतर तक्रार दाखल होईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कामगारांचे पैसे द्या, असे उदयनराजे म्हणाले होते. त्याचा राग आल्याने खोटी तक्रार दिली आहे. राजकीय विरोधकांनी गैरफायदा घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तिवाद मांडण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com