udyanraje about chimanrao kadam | Sarkarnama

उदयनराजेंच्या वडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा चिमणरावांनी आवाज उठविला! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

चिमणराव कदम अभ्यासू व दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते.

फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यातही लोकांवर अन्याय होतोय. पाच राज्यात जर सत्तापालट होत असेल तर फलटणमध्ये का नाही ? असा प्रश्‍न साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त उपस्थित केला. 

दरम्यान, माजी आमदार चिमणराव कदम अभ्यासू व दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले, असेही ते म्हणाले.

गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथे माजी आमदार चिमणराव कदम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाषराव देशमुख,  शारदादेवी कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाषराव शिंदे, डॉ. जे. टी. पोळ, अच्युतराव खलाटे,  पृथ्वीराज काकडे, सह्याद्री कदम उपस्थित होते. 

खासदार भोसले म्हणाले, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम यांनी लोकसेवेचा वसा घेतला होता. तोच वसा आता सह्याद्री यांनी पुढे चालवावा. आपण सर्वांनी सह्याद्रीच्या पाठिशी उभे राहावे. माझे व कदम घराण्याचे संबध हे जिव्हाळयाचे असून, यापुढे सह्याद्री कदम हा माझा धाकटा बंधू म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहे.'' 

माजी आमदार चिमणराव कदम एक अभ्यासू व दूरदृष्टी नेतृत्व होते. त्यांच्याकडे कर्तृत्व होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले. त्यांचे नाव पुढे येत होते पण राजकारणामुळे ते शक्‍य झाले नाही. फलटण तालुक्‍यातही लोकांवर अन्याय होतोय. पाच राज्यात जर सत्तापालट होत असेल तर फलटणमध्ये का नाही ? असा प्रश्‍न खासदार भोसले यांनी उपस्थित करत नाव न घेता फलटण तालुक्‍यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख