udyanraje | Sarkarnama

उदयनराजेंचे "बुरे दिन'! 

उमेश बांबरे 
रविवार, 23 एप्रिल 2017

गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांनी उदयनराजेंना चक्रव्यूहात टाकले आहे. यात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा ही यामध्ये समावेश आहे. हे चक्रव्यूह भेदून ते बाहेर पडण्यात यशस्वी होणार का, याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत. 
 

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अपयश, राष्ट्रवादीचा बेदखलपणा आणि खंडणीचा गुन्ह्यात जामीन नाकारल्याने 
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले सध्या चक्रव्यूहात अडकले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सध्या तरी ते संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.त्यांच्या या गैरहजेरीची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. 

खासदार उदयनराजे भोसले हे प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळेस त्यांचा हा नेहमीचा अजेंडा फोल ठरला. राष्ट्रवादी विरोधात आणि आमदार शिवेंद्रसिंहराजेंना अडचणीत आणण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने राष्ट्रवादीतील सर्व आमदार एकवटले व त्यांनी खासदारांना बेदखल केले. परिणामी उदयनराजेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपयश सहन करावे लागले. पालिका निवडणुकीतील विजयरथ त्यांना पुढे हाकता आला नाही.

काही दिवसांपूर्वी खंडाळ्यातील सोना अलाईज कंपनीच्या मालकांना खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अपुरे पडले. आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सध्या ते अटकटाळण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरच आहेत. त्यांचा केवळ काही निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. प्रत्येकाला उदयनराजे साताऱ्यात कधी येणार याची उत्सुकता आहे. पण पोलिस कधीही अटक करतील, त्यामुळे त्यांनी संपर्क क्षेत्राबाहेर राहणे पसंत केले आहे. जिल्ह्यात उदयनराजे असतील तर राजकीय वातावरण थोडे गरम राहते. ते कोणावर कधी गुगली टाकतील, याचा नेम नाही. पण विनाकारण कोणाला त्रासही ते देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी सातारकरांच्या मनातील प्रेम कमी होत नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख