udyanraje | Sarkarnama

गणिते चुकल्याने उदयनराजे शांत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची सर्व गणिते चुकल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी आता शांत राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे काही नेते उदयनराजेंचे अपराध पोटात घालत तेच पुन्हा खासदार व्हावेत, अशी भूमिका मांडू लागले आहेत.
 

सातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची सर्व गणिते चुकल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी आता शांत राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे काही नेते उदयनराजेंचे अपराध पोटात घालत तेच पुन्हा खासदार व्हावेत, अशी भूमिका मांडू लागले आहेत.

पक्षाला अडचणीत आणून आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याच्या प्रयत्नात उदयनराजे थेट जमिनीवर आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना सातारा तालुका वगळता उर्वरित तालुक्‍यात एक उमेदवार मिळविता आला नाही. उलट सातारा तालुक्‍यात त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी करून आपले उमेदवार निवडून आणले. पण त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा घेतलेला पवित्रा फसला. त्यांची सर्व राजकीय गणिते राष्ट्रवादीच्या आमदारांनी चुकविली. त्यामुळे सातारा विकास आघाडीचे निवडून आलेले सदस्य इतकीच त्यांची राजकीय ताकद राहिली आहे. पण या ताकदीच्या जोरावर ते आमदार शिवेंद्रसिंहराजेंना त्रास देण्याचे काम करणार आहेत. पंचायत समितीत त्यांचे सर्व सदस्य विरोधी बाकावर बसणार आहेत. तर जिल्हा परिषदेत त्यांचे सदस्य भाजपसोबत असणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचेच काही नेते आता पुढील वेळी आहे हेच खासदार असू देत. किमान पक्षातील नेत्यांना जागेवर तरी आणतील,अशी भूमिका घेऊ लागले आहेत. त्यामुळे काही कार्यकर्ते व नेत्यांना पुन्हा उदयनराजेंविषयी प्रेम निर्माण झाले आहे. तरीही पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार हे ऐनवेळी कोणता निर्णय घेतील, त्यावर आगामी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार अवलंबून असणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख