‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही - उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला - Udhhav Thakrey criticizes Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही - उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

सरकारनामा न्यूज ब्यूरो
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

मुंबई   : पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच! असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते.

मुंबई   : पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच! असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर या ‘५६ इंची’ छातीच्या मुद्यांवरच मोदी यांनी प्रचारसभांतून टाळ्या व नंतर भरघोस मते मिळवली. प्रत्यक्षात तीन वर्षांत काय घडले ? पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून ‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही, हे सत्य कसे नाकारणार ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 

‘पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याच्या गप्पा मारता, पण आधी श्रीनगरातील लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवून दाखवा !’ या डॉ. अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोंदीवर "सामनातून" हल्लाबोल केली आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, " डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा ! स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशात तिरंगा डौलाने फडकवला जातो, पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला जात नाही हे स्वातंत्र्याचे व हुतात्म्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. "

" त्यामुळे अब्दुल्लांचे बरळणे वेडेपणाचे व मानसिक झटक्याचे असले तरीही त्यात तथ्य हे आहेच. डॉ. अब्दुल्लांचे बोलणे फोल ठरवायचे असेल तर स्वातंत्र्यदिनाचे पुढचे भाषण पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर न करता असा ‘उप’ सोहळा आपल्या जम्मू-कश्मीरातील लाल चौकात करावा व तेच सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल," अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे पुढे लिहतात, " कश्मीरात आजही हत्या होत आहेत. रोजच जवान शहीद होत आहेत. तिकडे पलीकडे हाफीज सईद नावाच्या सैतानाची नजरकैदेतून सुटका झाल्याने तोही दहशतवाद व हिंसाचाराची नव्याने आखणी करीत आहे. यावर डॉ. अब्दुल्ला हे ठार वेड्यासारखे बरळले आहेत. "

"नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱ्यांत दहशतवाद संपला असून शांतता निर्माण झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. पण दहशतवाद कमी झाला असेल तर कश्मीरात रोज जवान शहीद का होत आहेत ? अब्दुल्लांचे बरळणे हे खरेच वेडेपणाचे आहे काय ?" असा प्रश्न विचारत ठाकरे यांनी देशात सगळाच सावळा गोंधळ सुरू असल्याची टीका केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख