उद्धव ठाकरेंनी सन्मानाने बोलावले आणि राज ठाकरेही उमदेपणाने आले  !

दोघेही भाऊराजकारणात असताना एकाने शिखर गाठले आणि दुसऱ्या भावाने त्याचे कौतुक केले असे दृश्य आजच्या काळात जरा दुर्मिळ झालेले आहे .
uddhav_raj_thakre
uddhav_raj_thakre

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला  राज ठाकरे येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते . पण अखेर राज ठाकरे आलेच . सहकुटुंब आले. एका भावाने दुसऱ्या भावाच्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणाला हजेरी  लावली . 

   उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला राज ठाकरे आपल्यासोबत  चिरंजीव अमित ठाकरे आणि  मातोश्री कुंदाताई ठाकरे यांना घेऊन आलेले होते.  

दोघेही भाऊ राजकारणात असताना एकाने शिखर गाठले आणि दुसऱ्या भावाने त्याचे कौतुक केले असे दृश्यआजच्या काळात जरा दुर्मिळ झालेले आहे . 

 राजकीय मतभेद असतानाही आपल्या निमंत्रणावर आलेल्या राज ठाकरे यांची आसनव्यवस्था उद्धव ठाकरेंनी  व्यासपीठावर करायला लावली होती . अमित ठाकरे यांनीही आपल्याला काकाच्या शपथविधीला हजर राहणे आवडेल असे आधीच सांगून ठेवले होते . 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती . या गर्दीमध्ये राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे या आल्या . कुंदाताई  ठाकरे यांना पाहताच उद्धव ठाकरे यांनी इतर मान्यवरांना थोड थांबवले आणि त्यांच्याशी संवाद साधला.  

उद्धव ठाकरेंना कुंदाताई ठाकरेंनी यावेळी जवळ घेतले . त्यांच्या पाठीवरून प्रेमाने  हात फिरवला . त्यावेळी कुंदाताईंना बोलता बोलता भावना अनावर झाल्या.   उद्धव ठाकरेही क्षणभर भावनिक झालेले दिसले पण त्यांनी स्वतःला लागलीच सावरले . 

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे या दोघी सख्ख्या बहिणी !  बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू  श्रीकांत ठाकरे यांच्यात अतिशय प्रेम होते. जॉईन्ट फॅमिली होती. दोघी बहिणी एकाच छताखालीही राहिल्या होत्या. त्यामुळे  आपल्या भाच्याचे कौतुक  मावशीने नाही तर कोणी  करायचे ही भावना त्यांच्या देहबोलीतून दिसत होती. 

उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आवर्जुन राज ठाकरे यांना फोन केला आणि शपथविधीला हजर राहण्याचे निमंत्रण दिले होते .  त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. 

त्या निमंत्रणाचा मान राखून आणि टोकाचे राजकीय मतभेद असूनही राज ठाकरे यांनी त्या समारंभाला हजर राहून मनाचा मोठेपणा दाखवला अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती . त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भावंड जसं वय वाढत आहे तसे मॅच्युअर होत चाललेले आहेत . त्यांच्यात राजकीय संघर्ष कदाचित  पुढे चालूही  राहील , परंतु या दोघांमध्ये  वैराची भावना आता कुठे दिसत नाही , असे एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले . 

एन्फॉर्समेंट  डिरेक्टोरेटने  म्हणजेच ईडीने  राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावाची पाठराखण करण्याचे धोरण स्वीकारले होते.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधात आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले असले तरी वैयक्तिक हल्ले करण्याचे टाळले होते. 

या दोन भावाची राजकीय मतभेद जरी दूर झालेले नसले तरी दोघांच्या संबंध काही प्रमाणात का होईना सौहार्दपूर्ण झाले याचा याबद्दल शिवसेना  आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांमध्ये   आनंद व्यक्त होताना दिसला . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com