उध्दव ठाकरेंचे भाजपकडील लातूर- बीडवर विशेष लक्ष  ?

युतीमध्ये बीड, लातूर आणि जालना भाजपकडे असल्यामुळे शिवसेनेने इथे यापुर्वी कधी उमेदवार दिले नव्हते. बीडमध्ये दहा वर्षापुर्वी शिवसेनेची जी ताकद होती ती आज राहिलेली नाही.
Thakray
Thakray

औरंगाबादः भाजपच्या जुमलेबाजीचा भांडाफोड आणि प्रखर हिंदुत्व हा अजेंडा घेऊनच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मराठवाड्यातील बीड, लातूर आणि औरंगाबाद या शहरात झालेल्या मेळाव्यांमधून पुन्हा एकदा शिवसेनेने हिंदुत्वाचाच हुंकार दिल्याचे दिसून आले. 

उध्दव ठाकरे यांनी एकाच दिवसात लातूर, बीड आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये गटप्रमुखांचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जांगाचा विचार केला तर शिवसेनेकडे सध्या उस्मानाबाद, परभणी आणि औरंगाबाद हे तीन मतदारसंघ आहेत. 

युतीमध्ये बीड, लातूर आणि जालना भाजपकडे असल्यामुळे शिवसेनेने इथे यापुर्वी कधी उमेदवार दिले नव्हते. बीडमध्ये दहा वर्षापुर्वी शिवसेनेची जी ताकद होती ती आज राहिलेली नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या प्रेमाखातर देत राहिलो आणि जिल्हाच रिकामा झाला अशी खंत उध्दव ठाकरे यांनी बीडमध्ये बोलून दाखवली. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना बहीण मानणाऱ्या शिवसेनेने आता पुन्हा एकदा बीडमध्ये आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा प्रत्यय कालच्या मेळाव्यातून आला. पण भाजप, राष्ट्रवादीच्या प्रभावात जिल्ह्यात शिवसेना कोमजून गेल्याचे चित्र आहे. 

हीच परिस्थीती लातूरच्याही बाबतीत आहे. महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहा विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेची पाटी कोरी आहे. त्यामुळे बीड, लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उध्दव ठाकरे यांनी उत्साह भरण्याचा प्रयत्न केला असला तरी या ठिकाणी यश मिळवण्यासाठी शिवसेनेला बरीच वाट पहावी लागणार आहे. 

गटप्रमुख पक्षाचा पाया, पाठीचा कणा असतो, तुमच्या जोरावरच मी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहतोय असे सांगत उध्दव ठाकरेंनी गटप्रमुखांना मार्गदर्शन केले. हे करत असतांनाच भाजपचे नेटवर्क देखील घराघरापर्यंत पोहचल्याची कबुली त्यांनी दिली. गटप्रमुखांना मोबाईल, मोटारसायकल आणि पैसे दिले जात असल्याचा उल्लेख केला. 

शिवसेने इतके कार्यकर्त्यांचे जाळे इतर कुठल्याही पक्षाकडे नाही हे आतापर्यंत सांगितले जायचे. पण आता या स्पर्धेत भाजप देखील मागे नाही हे उध्दव ठाकरे यांनीच आपल्या भाषणातून निदर्शनास आणून दिले. तेव्हा आता भाजपच्या या नेटवर्कचा शिवसेना कसा मुकाबला करणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पुन्हा हिंदुत्व 

"अच्छे दिन येतील तेव्हा येओ, पण मला जुने दिवस आल्याचे पाहून अभिमान वाटतो' अशी मखलाशी उध्दव ठाकरेंनी केली. भाजपने वाऱ्यावर सोडून दिलेला राम मंदिराचा मुद्दा हायजॅक केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आलेले नवचैतन्य पाहून उध्दव ठाकरे चांगलेच भारावून गेले. स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपवर दबाव वाढवण्याचा भाग म्हणून देखील शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्याकडे बघितले जात आहे. 

तिकडे शिवसेनेचे नेते अयोध्येत जाऊन राम मंदिर समितीच्या संत-महंताच्या भेटीगाठी घेऊन वातावरण निर्माण करत असतांना इकडे राज्यात शिवसेनेच्या व्यासपीठावर राम अवतरल्याचे पहायला मिळाले. व्यासपीठावर हाती धनुष्यबाण घेतलेली प्रभू रामांची मुर्ती आवर्जून ठेवली जात आहे. जय महाराष्ट्र सोबतच जय श्रीरामच्या घोषणा शिवसैनिक बेंबीच्या देठापासून देत आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राम मंदिर आठवले का? या टिकेलाही उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देतांना दिसतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ हे त्यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यात सध्या भयंकर दुष्काळाची परिस्थीती आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी या विषयाला हात घालत शेतकरी आणि शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे कायम उभा राहणाऱ्या मराठवाड्यातील जनतेबद्दलचा कळवळा देखील दाखवला. 

सरकारच मदत करेल तेव्हा करेल, पण शिवसैनिकांनी शेतकऱ्याला शक्‍य होईल ती मदत करावी असे आदेशच उध्दव ठाकरे यांनी दिले. कर्जमाफी, हमीभाव, शेतकरी आत्महत्या या मुद्यांवरून भाजपला लक्ष्य करतांनाच जनतेसाठी मी सरकारवर आसूड ओढतच राहणार या भूमिकेवर देखील उध्दव ठाकरे ठाम राहिले. यातून शेतकऱ्यांची सहानुभूती शिवसेनेच्या बाजूने कशी राहील असाच त्यांचा प्रयत्न दिसून आला. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर नुकत्याच झालेल्या दसऱ्या मेळाव्यात उध्दव ठाकरे त्यावर काही बोलतील अशी अपेक्षा होती. पण " एकदा सांगितले ना, त्यावर किती वेळा बोलायचे' असे म्हणत हा विषय झटकला होता. त्यामुळे स्वबळाचे हे अवसान शेवटपर्यंत कायम राहील की नाही याबद्दल शिवसैनिकच साशंक आहे. 

मराठवाड्यातील गटप्रमुखांच्या मेळाव्यात देखील उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशी डरकाळी फोडली खरी, पण तो स्वबळावर की युती करून हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. युती संदर्भात उध्दव ठाकरे एक घाव दोन तुकडे करतील अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती पण ती फोल ठरली. यावरून शिवसेना अजूनही वेट ऍन्ड वॉचच्याच भूमिकेत दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com