ठाकरे भाजपवर कडाडले , पाठीत खंजीर खुपसायचा म्हणजे युती नव्हे !

युती प्रामाणिक वाटली पाहिजे. जनता आंधळी नाही. तिने राज्यातील युतीला भरभरून आशीर्वाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट केले आणि उत्तर प्रदेशात निवडणूक, खुर्चीसाठी एकत्र आलेल्या सपा- बसपाला लाथाडले हे लक्षात घ्यावे. -उद्धव ठाकरे
Uddhav Thakare @Dhule
Uddhav Thakare @Dhule

धुळे : एकीकडे श्रीरामाच्या मंदिराचा उल्लेख करायचा, प्रभू श्रीरामाचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे हराम- हराम करायचे हे योग्य नाही. बाजूबाजूला बसायचे आणि खुर्चीचा पाय कापण्याची स्पर्धा करायची, मग ईर्षेतून दोघांनी हा उद्योग केला की खाली पडायचे याला युती म्हणत नाही. यात पाठीत खंजीर खुपसणारी आपली औलादच असू शकत नाही, अशा खोचक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे भाजपचे कान उपटले.
 

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ श्री. ठाकरे यांची जेलरोडवर विराट सभा झाली. त्यांनी ठाकरे शैलीत मित्रपक्ष भाजपला युती धर्माचा नेमका अर्थ समजावून सांगितला. त्यावर जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटाने ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन दिले.

शिवसेना धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला प्रामाणिकपणे मदत करत आहे. तशीच मदत भाजपने धुळे शहर मतदारसंघात शिवसेनेला करावी या मुद्यावरून श्री. ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

श्री. ठाकरे म्हणाले, बाजूबाजूला बसायचे. खुर्चीच तंगड कस मोडता येईल ते बघायचं. मग एका खुर्चीचा एकाने पाय कापायचा, त्याने दुसऱ्याच्या खुर्चीचा पाय कापायचा. याला युती म्हणत नाही. असा कर्म दरिद्रीपणा शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकविलेला नाही. युती करायची तर ती दिलखुलासपणे असली पाहिजे. एकमेकांचे घोंगडे खेचण्याची स्पर्धा नको. पाठीकडून वार करण्याची आपली औलाद असू शकत नाही. अन्यथा, त्याच्या हातात शिवरायांचा भगवा शोभणार नाही, असे श्री. ठाकरे यांनी भाजपला परखडपणे सुनावले.

श्री. ठाकरे पुढे म्हणाले, की प्रभू श्रीराम एकवचनी, सत्यवचनी होते. त्यांनी एकदा वचन दिले की दिले. पित्याच्या वचनासाठी त्यांनी सत्तेचा त्याग केला. असे असताना राम मंदिर, प्रभू श्रीरामाचा उल्लेख करायचा. त्याचे मंदिर बांधायचे. मग त्यांच्याकडून आपण शिकतोय काय याचा विचार करायचा नाही. मंदिरात घंटा बडवायची, आरती करायची, श्रीराम- श्रीराम करायचे आणि दुसरीकडे हराम- हराम करायचे हे योग्य नाही.

युती छान, अभिमानास्पद असली पाहिजे. जनतेचा तिच्यावर विश्‍वास बसला पाहिजे. युती प्रामाणिक वाटली पाहिजे. जनता आंधळी नाही. तिने राज्यातील युतीला भरभरून आशीर्वाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट केले आणि उत्तर प्रदेशात निवडणूक, खुर्चीसाठी एकत्र आलेल्या सपा- बसपाला लाथाडले हे लक्षात घ्यावे. 

राज्यातील युती ही मन, विचार, चांगल्या कारभारासाठी झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. ती लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा आशीर्वाद देणारच आहे. त्यामुळे तिला आनंद, सुख समाधानाचे चार क्षण देण्यासाठी युती झाली आहे. त्याविषयी शपथ घेऊन राज्यात युतीचे सरकार आणू या, त्यासाठी तयार राहूया, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी केले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com