उद्धवजी, शरद पवार, भुजबळ यांनी भाजी विक्रेत्याला आमदार केले

घराला हातभार लावण्यासाठी सकाळचे कॉलेज झाल्यावर दुपारी दादरहून भाजी आणायचो व संध्याकाळी एमएचबी कॉलनीतील रस्त्यावर बसून ती विकायचो.
Prakash-surve
Prakash-surve

हाविद्यालपासूनच मला राजकीय-सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले होते. एकीकडे महाविद्यालयात शिकत असताना घराला हातभार लावण्यासाठी संध्याकाळी रस्त्यावर भाजी विकण्याचेही काम केले. उद्धव ठाकरे, शरद पवार, छगन भुजबळ यांच्यामुळेच एकेकाळचा भाजीविक्रेता असलेला मी आमदार होऊ शकलो. 

मुंबई : माझा राजकीय प्रवास शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असा आहे. महाविद्यालयात मी स्वबळावर राजकारण केले तरी नंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी भरभरून दिले. तर ठाकरे कुटुंबानेही मला भरपूर प्रेम दिले. 

10 वी नंतर गावाहून मुंबईत आलो, विभागात आमचे झुंजार मित्र मंडळ होते, तेथे कार्यकर्तेगिरी-नेतेगिरी करण्याचा अनुभव मिळाला. बोरीवलीच्या गोखले कॉलेजात असताना तेथे शिवसेनेचे काम करीत होतो. कॉलेजात सर्व मित्र एकत्र येऊन कॉलेजचा यूआर देखील झालो. दबदबा वाढत गेला व आम्ही शेजारच्या कॉलेजचेही यूआर ठरवू लागलो. 


घराला हातभार लावण्यासाठी सकाळचे कॉलेज झाल्यावर दुपारी दादरहून भाजी आणायचो व संध्याकाळी एमएचबी कॉलनीतील रस्त्यावर बसून ती विकायचो. 1980 मध्ये त्याचे रोज सात आठशे रुपये मिळत असत. या व्यवसायात लहान भावाने व आईनेही पुष्कळ मदत केली. अनेकदा पालिका अधिकारी ठेला उचलून नेत असत, मग कधी दंड भरून, केव्हा बाबापुता करून तो सोडवावा लागत असे. काम करून शिकणारा मुलगा म्हणून अधिकाऱ्यांचीही सहानुभूती मला होतीच. अशा संघर्षातूनच शिकत गेलो.


कॉलेजात शेवटच्या वर्षात ओटीस कंपनीत सहा महिने नोकरी केली, पण धंद्याचे आकर्षण असल्याने ती सोडली व मिक्सर ग्राईंडरच्या मोटारी बनवणाऱ्या काकांच्या फॅक्ट्रीत शिकून ज्ञान मिळवले. पुढे एका व्यापाऱ्याबरोबर भाईंदरला युनिट टाकले व तेथून जम बसत गेला. 


कॉलेजच्या शेवटी शेवटी काँग्रेसच्या नरेंद्र वर्मा यांनी आपल्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली. काहीकाळ काँग्रेसची विद्यार्थीसेना असलेल्या एनएसयुआयचा जिल्हाध्यक्ष झालो. काम करताना छगन भुजबळांच्या संपर्कात आलो, त्यांनी मला पुष्कळ संधी दिली, उपनगरचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष केले. सेना-भाजप युतीचे सरकार असताना पुष्कळ आंदोलने केली, ती पाहून शरद पवारांची माझ्यावर मर्जी बसली. 


भुजबळांच्या 54 व्या वाढदिवशी 54 अपंगांना साह्य केले. यामुळे भुजबळांचा माझ्यावर चांगलाच विश्वास बसला. महापालिका निवडणुकीत युवक काँग्रेसमधील माझ्या गटाला 14 तिकिटे मिळाली, त्यातील भास्कर खुरसंगे, संध्या दोशी आदी तिघांना आम्ही विजयी करू शकलो. किणी प्रकरणात मुंबईत मी मा. राज साहेबांविरुद्ध अत्यंत ` ज्वलंत ` आंदोलन करणारा पहिला होतो. त्यामुळे भुजबळांच्या मी चांगलाच लक्षात राहिलो, अर्थात या आंदोलनामुळे मला तडीपारही करण्यात आले. पण सुदैवाने न्यायालयाने मला दिलासा दिला. 


दरम्यान काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाल्यावर मी राष्ट्रवादीत गेलो. 2009 मध्ये मागठाण्यातून उमेदवारीही मिळाली, पण तेव्हा मनसेची लाट होती व आमच्या पक्षाने ज्यांना उमेदवारी डावलली त्यांनी मला मदत केली नाही. माझा अनुभवही कमी पडला आणि विभागही नवा होता. म्हणून मला सात हजार मतांनी पराभव पत्करावा लागला, तरी मला 45 हजार मते मिळाली ही सुखावणारी बाब होती. 


पराभवानंतर खचून न जाता एक दिवसही रजा न घेता मी दुसऱ्याच दिवसापासून इर्ष्येने झपाटून काम सुरु केले. कामे करण्यासाठी निधीची कमतरता होती, तेव्हा इतर विधानपरिषद आमदार, राज्यसभेचे खासदार यांच्या मिनतवाऱ्या करून त्यांचा निधी मागठाण्यात आणून तडफेने कामे केली. माझा जनसंपर्क प्रचंड वाढला होता, 2014 ला येथून राष्ट्रवादी काँग्रेस मला उमेदवारी देणार हे ठरलेच होते.


 राष्ट्रवादीने मला काहीही कमी केले नाही, पण शेवटी राजकारणात टिकून राहण्यासाठी विजयी होणे महत्वाचे असते. समोर मनसेचा तगडा आमदार असताना आपले विजयाचे गणित जुळत नसल्याचे कळत होते. विभागात शिवसेनेला मानणारे आणि शिवसेनेपासून दूर जाऊन मनसेला जवळ करणारे लोकही भरपूर होते. 

अशा स्थितीत माझी मते व शिवसेनेची ही मते एकत्र आली तर नक्कीच विजय मिळेल हे जाणवले. त्याचवेळी माझे काम बघून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ऑफर दिली व निवडणुका तोंडावर असताना मी शिवसेनेत गेलो व आमदारही झालो. तीनच वर्षांत विभागात शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून आणले. पक्षाची वाढवलेली ताकद व कामे या बळावर 2019 ला देखील सहज निवडून आलो. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मला अजूनही आदर आहे, चांगल्या व्यक्तींना आपण विसरूच शकत नाही. त्यांनी तसेच अजितदादा, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मला बिकट काळात मदत केली होती.

उद्धव ठाकरे यांचा स्वभाव छान असून आदित्य ठाकरे यांचीही पुष्कळ मदत होते, रश्मीवहिनीही माझ्या प्रचारसभेत आल्या होत्या. ठाकरे परिवारानेही मला भरपूर प्रेम दिले. मात्र भुजबळ साहेबांनी माझ्या भुजांना बळ पुरवले, हाच माझ्या राजकीय वाटचालीतील टर्निंग पॉईंट ठरला. 


शब्दांकन:  कृष्ण जोशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com