बीड जिल्हा शिवसेनेसाठी दुष्काळी....तरी ठाकरे यांचे धूळपेरणी!

उद्धव ठाकरे यांनी आज बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण सेनेलाही साथ देण्याचे आवाहन केले. पाऊस पडेल या आशेने केलेल्या पेरणीला धूळपेरणी म्हणतात. उद्धव यांनीही आज राजकीय पिकाची अपेक्षा नसताना आज पेरणी केली.
बीड जिल्हा शिवसेनेसाठी दुष्काळी....तरी ठाकरे यांचे धूळपेरणी!

बीड : बीड जिल्हा फक्त शेतकऱ्यांसाठी दुष्काळी नसून तो राजकारणामध्ये शिवसेनेसाठीसुद्धा आहे. हा दुष्काळ हटणार की नाही? दुष्काळ गंभीर तिथे शिवसेना खंबीर असून ती तुमच्या मागे उभी आहे. तुमच्या आयुष्यातील हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळही तुम्हालाच हटवावा लागेल. एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा दुष्काळ तुम्ही हटवा, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बीड येथे आज केले.

शिवसेनेच्या दुष्काळाविषयी ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत आज बीड येथे अपेक्षा व्यक्त केल्या. खरे तर एके काळी बीड हा सेनेचा किल्ला बनला होता. मात्र गोपीनाथ मुंडे मागत गेले आणि आम्ही देत गेलो, असे उद्धव यांनी सांगत याविषयी नुकतीच खंत व्यक्त केली होती. आजच्या दुष्काळी मेळाव्यातही त्यांनी वेगळ्या शब्दांत बीडमध्ये शिवसेनेला बळ देण्याचे आवाहन केले. त्यांचे हे आवाहन बीडची जनता मनावर घेणार का, याची उत्सुकता आहे.

ते म्हणाले की गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आमचा उपयोग करून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असं मी मागेच सांगितलं होतं. गेली साडेचार वर्ष आपण त्यांची साथसोबत केली. मात्र ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न  सोडवू शकलात ना राम मंदिराचा विषय. राम हा एका प्रदेशाचा देव नाही, तो आपल्या सगळ्यांचा देव आहे. सराकर बदलल्यानंतर राम मंदिर होईल असं वाटलं होतं. मात्र पंतप्रधान म्हणतात की न्यायालय जे काही करेल ते. जर न्यायालयच निर्णय घेणार होतं तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात हा प्रश्न सोडवू म्हणून का सांगितलंत ? म्हणूनच मी घोषणा दिली आहे की `हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार.`

तुम्ही आता जुमल्यांवर जुमले बांधत चालला आहे,राम मंदिराचाही जुमला ? हे चालणार नाही. आता मी सरकारला इशारा देतोय की घोषणांचा पाऊस बंद करा. जेवढ्या घोषणा केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी नीट करा. केंद्राचं पथक येऊन गेलं त्याला दीड-दोन महिने झाले. मला असं कळालं की बीडमध्ये जेव्हा हे पथक येऊन गेलं त्यानंतर रेशनवर जे धान्य मिळत होतं त्यामध्येही कपात झाली असं मला कळालं आहे. हे खरं का खोटं ते तुम्हीच मला सांगा. मला मुंबईत बसून या बातम्या कळतात. मला शेतीमधलं कळत नाही मात्र तुमचं सुख-दु:ख कळतं, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांनो तुम्ही भीक मागत नाही आहात तर तुमच्या हक्काचं मागताय. आपण गाईला गोमाता म्हणतो पण तिचं पालकत्व आपल्याकडे आहे. गोठ्यात बांधलेली गाय किंवा बैल हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य असतो. आपल्याला खायला मिळालं नाही तरी चालेल मात्र गोमातेला,बैलाला खायला मिळालं पाहीजे असं म्हणून उपाशी राहणारे शेतकरी मी बघितले आहेत. आपण माणसांसाठी जशा पाण्याच्या टाक्या देतोय तसेच जनावरांसाठी हौदाचेही शिवसेना वाटप करणार आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com