नवी मुंबई शिवसेनेत खदखद नगरसेवक राजीनामे देणार

नवी मुंबई शिवसेनेत खदखद  नगरसेवक राजीनामे देणार


नवी मुंबई : नवी मुंबई शिवसेनेत गेल्या अनेक महिन्यापासून खदखदत असलेला र्अंतगत असंतोष अखेरीला शनिवारी सकाळी उफाळून आला. संघटनात्मक कामकाजामध्ये व पालिका मुख्यालयातील कामकाजातील पद वितरणात ठराविक घटकांच्या अरेरावीविषयी नगरसेवकांच्या असंतोषाचा स्फोट झाला. नाराज नगरसेवकांनी एकत्रित येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारपर्यंत राजीनामापत्र देणाऱ्यांची संख्या दहापर्यंत गेली असून सांयकाळपर्यत नाराज नगरसेवकांचा आकडा पंधराच्या घरात जाण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुख पदरिक्त असतानाही 2015साली झालेल्या महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 38 नगरसेवक निवडून आले.गणेश नाईकांनी 1999 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेनेला मरगळ आली होती. तब्बल 16वर्षांनी महापालिका सभागृहात 38 नगरसेवकांच्या माध्यमातून शिवसेना पालिका सभागृहात प्रभावी दिसू लागली. पण शिवसैनिकांसाठी हे सुख औटघटकेचेच ठरले. सभागृहात नगरसेवक असणारी शिवसेना पालिका सभागृहात कधीही एकसंध दिसली नाही. पालिका सभागृहातील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर गटबाजी असून सभागृहातील नगरसेवक विजय चौगुले आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा या दोन गटामध्ये शिवसेना नगरसेवक विभागले गेले असून अनेक नगरसेवक स्वयंभू असून तेही आपला तीन ते चार नगरसेवकांचा गट बनवून आहेत. 
महापालिका सभागृहात वावरणाऱ्या शिवसेना नगरसेवकांमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंबाबत नाराजी वाढीस लागली असून त्याविरोधात बोलण्याचे कोणी धाडस दाखवीत नव्हते. विजय चौगुले पाचव्या सभागृहात सुरूवातीपासून विरोधी पक्षनेतेपदावर कार्यरत असून स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये त्यांच्याही नावाचा समावेश करण्यात आल्याने शिवसेना नगरसेवकांचा आजवरचा सुप्त विरोध उफाळून आला आहे. दीड महिन्यापूर्वी महापालिकेत अर्थसंकल्पाचे वाचन करताना स्थायी समिती सभापती व शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नावाचा भाषणात उल्लेख न केल्याने गदारोळ निर्माण झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने मातोश्रीवर नाराज नगरसेवकांची बैठक बोलावून मनोमिलाफाचा सल्ला दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश देवूनही आजतागायत शिवसेना नगरसेवकांच्या मनोमिलाफाची मीटिंग आयोजित करण्यात आलेली नाही. 

विजय चौगुले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रवेशानंतर विजय चौगुलेसभोवतालीच शिवसेनेची पदे विखुरली जावू लागल्याने मातोश्रीने ऐरोलीला शिवसेना संघटना आंदण दिली आहे काय, असा संतापही वेळोवेळी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. विजय चौगुलेंना शिवसेनेकडून एकवेळा लोकसभेची व दोन वेळा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तीनही निवडणुकांमध्ये विजय चौगुले पराभूत झाले. पालिका निवडणुकीत ऐरोली व अन्यत्र ठिकाणी चौगुले समर्थकांनाच तिकिटांचे वितरण करण्यात आले. घणसोली नोड यांचे उत्तम उदाहरण आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत पाटील यांना तिकीट देण्यात आले. एक जागेवर शिवसेना पराभूत झाली. पालिका निवडणूक झाल्यावर चौगुलेंना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले. दोन वर्षे तेच या पदावर कार्यरत आहेत. 

सहा-सात दिवसावर आलेल्या स्थायी समिती सदस्य निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक हमखासपणे स्थायी समितीवर जाणार आहेत. यामध्ये शिवसेनेकडून विजय चौगुले, सोमनाथ वासकर, नामदेव भगत, रंगनाथ औटी व सरोज पाटील यांची लिफाफ्यातून पालिका प्रशासनाकडे नाव गेल्याचे समजताच उर्वरित शिवसेना नगरसेवकांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे. ऐरोलीतून एकाच परिवारातून अधिक निवडून आलेले शिवसेना नगरसेवकही नवी मुंबईत चौगुले विरोधकच म्हणून ओळखले जात आहेत. नामदेव भगत व रंगनाथ औटी हे महापालिका निवडणुकीच्या अगोदरच नुकतेच शिवसेनेत आले आहेत. सोमनाथ वासकरांच्या नगरसेविका पत्नी कोमल वासकर यांना यापूर्वी स्थायी समितीवर शिवसेनेकडून पाठविण्यात आल्याने वासकर परिवारालाच झुकते माप कशासाठी असाही प्रश्‍न शिवसेना नगरसेवकांकडून विचारण्यात येत आहे. 

याच असंतोषाचा फायदा उचलत शिवसेनेच्या एका उपनेत्याने व एका विधानसभा संपर्कप्रमुखांने नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. नाराज नगरसेवकांनी वाशीतील एका पतसंस्थेमधील नाराज नगरसेवकांना दिवसभरात बोलावून त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे राजीनामा पत्र लिहून घेण्याचा व गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता. नेरूळ, तुर्भे, कोपरखैराणे भागातील काही शिवसेना नगरसेवकांनी आपले राजीनामे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावे संबंधित उपनेते व विधानसभा संपर्कप्रमुखाकडे जमा केले होते. यामध्ये शिवसेना महिला संघटनेची महत्त्वपूर्ण पदाधिकारीदेखील या प्रक्रियेत आघाडीवर होती. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दहा नगरसेवकांनी राजीनामे दिले असून अजून सहा ते सात नगरसेवक राजीनामे देणार असल्याचे सांगितले. सर्व नगरसेवकांचे राजीनामे एकत्रितपणे मातोश्रीवर प्रत्यक्ष पाठविण्यात येणार आहेत अथवा फॅक्‍स केले जाणार असल्याचे सांगितले. शिवसेनेतील या नाराजीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस बारीक लक्ष ठेवून आहे. भविष्यात हा असंतोष वाढीस लागल्यास ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या महापौर निवडणुकीअगोदर शिवसेनेत फूट पडण्याची अथवा अष्टविनायक गटाची निर्मिती होण्याची भीती शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com