उद्धव ठाकरेंनी वनगा कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला ...! 

 उद्धव ठाकरेंनी वनगा कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला ...! 

पुणे : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय देणार. श्रीनिवास तू आता थांब. तुझा पुढे विचार करू असा अशा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला. पालघरमधून चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना तिकिट दिले आहे. 

चिंतामण वनगा हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते डहाणू-तलासरी सारख्या आदिवासी भागातून पुढे आलेले नेतृत्व होते. भाजपचे ते डहाणूमधून खासदार म्हणूनही निवडून आले होते. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पुढे पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली.

लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचनाही झाली आणि डहाणू पालघर लोकसभा मतदारसंघात आला. 2014 मध्ये वनगा हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. पुढे त्यांचे आकस्मित निधन झाले. भाजपलाही हा मोठा धक्का होता. कारण वनगा यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्ची केले होते. 

वनगा यांच्या निधनानंतर आम्हाला पक्षाने वाऱ्यावर सोडले अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना झाली. त्यांनी भाजपचा त्याग करीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि शिवबंधन बांधून घेतले. वनगांच्या निधनानंतर श्रीनिवास यांना भाजपतर्फे तिकिट मिळेल असे बोलले जात होते. पण तसे काही झाले नाही.

पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला. उद्धव यांनी श्रीनिवास यांना मैदानात उतरविले तर भाजपने राजेंद्र गावित यांना कॉंग्रेसमधून आयात करून तिकिट दिले. त्यांना निवडून आणले. 

पुढे 2019 च्या लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये समझोता झाला. रूसवेफुगवे दूर झाले. पुन्हा हातात हात घेऊन निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी श्रीनिवास यांनाच तिकिट मिळेल असे वाटत असताना घडले मात्र भलतेच.

राजेंद्र गावित हे भाजपमध्ये न राहता शिवसेनेत आले आणि खासदार झाले. श्रीनिवास वनगा नाराज झाले पण, खुद्द उद्धव यांनीच त्यांची समजूत काढली. लोकसभेऐवजी तुला विधानसभेत पाठवितो असे आश्‍वासन दिले होते. श्रीनिवास हे शांत राहिले आणि पक्षाचे काम करीत राहिले. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडत आले. 

2019च्या विधानसभेसाठी पालघरमधून विद्यमान आमदार अमित घोडा यांना तिकिट द्यायचे की श्रीनिवास वनगा ! हा जेव्हा प्रश्‍न पुढे आला तेव्हा अर्थात श्रीनिवास यांचेच नाव पुढे आले आणि उद्धव यांनी श्रीनिवास यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना घोडा नाराज होणे अपेक्षितच होते. तरीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र पाठक यांनी त्यांची समजूत काढत तुला एमएलसी देतो थोडं थांबा असे सांगितले होते.

मंत्री शिंदे यांनी तर स्वत: त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला. नाराज होऊ नका. संधी पुन्हा मिळेल असे सांगितले पण, नाराज अमित घोडा यांची थांबण्याची तयारी नव्हती. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधून घेतले. 

वास्तविक अमित घोडा हे स्वगृही आले आहेत असे मानावे लागेल. कारण त्यांचे पिताश्री कृष्णा घोडा हे मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. ते डहाणूमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. पुढे पराभव झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आमदार बनले होते. त्यामुळे शिवसेनेतून पुन्हा अमित घोडा हे आपल्या वडिलांच्या मुळ पक्षात आले आहेत असे म्हणावे लागेल. 

दरम्यान, अमित घोडा हे राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेला काही फरक पडत नाही. त्यांना आमच्या नेत्यांनी थाबविण्याचा प्रयत्न केला पण, ते थांबले नाहीत. उद्धवसाहेबांनी सांगूनही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अमित घोडा हा विषय आमच्यासाठी संपला आहे अशी प्रतिक्रिया पालघर शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास मोरे यांनी सांगितले.

एकमात्र खरे उद्धव यांनी वनगा कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला आहे. जर श्रीनिवास निवडून आले तर ते आमदार होणार आहेत. ते ही वडीलांप्रमाणे पुढील दरवाज्याने. कारण चिंतामण वनगा हे खासदार होते तसेच ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com