उदगीरच्या नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय - Udgir second generation of established leaders became active | Politics Marathi News - Sarkarnama

उदगीरच्या नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय

युवराज धोतरे 
गुरुवार, 16 मे 2019

गेल्या तीस ते चाळीस वर्षात उदगीरचे राजकारण ज्यांच्या भोवती फिरले अशा राजकीय नेत्यांची दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे.

उदगीर : गेल्या तीस ते चाळीस वर्षात उदगीरचे राजकारण ज्यांच्या भोवती फिरले अशा राजकीय नेत्यांची दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे.उदगीर मतदारसंघातील विविध लग्न समारंभ व अनेक सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी होऊन जास्तीत जास्त युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये उदगीरने नेहमी काँग्रेस पक्षाला कौल दिला आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून उदगीर करांनी भाजपाला दोन वेळा संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला एक वेळा संधी मिळाली. उदगीर शहर हे सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. यावेळी प्रथमच नगरपालिकेत भाजपला संधी मिळाली आहे.

उदगीरच्या नगरपालिकेत सातत्याने सात वेळा काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेले राजेश्वर निटूरे यांची दुसरी पिढी त्यांचे चिरंजीव विजय निटुरे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाले असून नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा एकेकाळी ज्यांच्या सभोवती राजकारण फिरत असत असे बसवराज पाटील नागराळकर यांची दुसरी पिढी चंदन पाटील नागराळकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उदगीरच्या राजकारणात सक्रिय झाले  आहेत.

एकेकाळी उदगीरच्या राजकारणात हुकमी एक्का समजले जाणारे (कै) विलास भोसले यांचे चिरंजीव व माजी आमदार उदगीरच्या राजकारणात स्वतःचे वलय निर्माण करणारे(कै) चंद्रशेखर भोसले यांचे पुतणे बंटी उर्फ विक्रांत भोसले हे शहरातील राजकारणामध्ये सक्रिय झाली आहेत. ते सध्या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.

उदगीरचे माजी आमदार व भाजपाचे प्रदेश सचिव उदगीर तालुक्याच्या राजकारणामध्ये वलय असलेले गोविंदराव केंद्रे यांची दुसरी पिढी राहुल केंद्रे हे लोहारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय झाले आहेत त्यांनी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये असलेल्या तरुणाचे संघटन करून आपल्या अस्तित्वाची तयारी चालू केली आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस व गावागावात अखंड हरिनाम शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असे या दोन्ही माध्यमातून जास्तीत जास्त कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण सक्रिय असल्याचा संदेश ही युवा पिढी जनतेला देत आहे. त्यामुळे येणारे भविष्यातील राजकारण हे आता यात दुसऱ्या पिढीच्या वलयातुनच होणार हे दिसून येत आहे.

उदगीरच्या राजकारणात सक्रिय असलेले नेतृत्व सध्या दुय्यम बाजूला चालल्याचे दिसून येत आहे.बदलत्या काळाच्या ओघात व सोशल मीडियाच्या अति प्रभावाने आता जुन्या राजकारण्यांना पसंती कमी प्रमाणात मिळत असल्याचे दिसते. मात्र या नव्या चेहऱ्यांना जास्त तरुणाईचे लाईक मिळत असल्याने राजकारणातील ही दुसरी पिढी सक्रिय राजकारणात दिसून येत आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघ सध्या अनुसूचित जाती साठी राखीव आहे.आता दोन टर्म संपलेली आहेत. तिसरा टर्म होऊ घातला आहे. शिल्लक तीन टर्म  पुर्ण झाल्यानंतर यात राजकारण्यांच्या दुसऱ्या पिढीतून उदगीरचा भविष्यातील आमदार ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख