औरंगाबादवर पुन्हा भगवा फडकविणारच : उद्धव ठाकरे

औरंगाबादवर पुन्हा भगवा फडकविणारच : उद्धव ठाकरे

जालना : राज्यात पिकवीमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे. शेतकऱ्यांची लुबाडणुक करणाऱ्या विमा कंपन्याना आता सरळ करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संभाजीनगरवर पुन्हा भगवा फडकवणारच 
लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने चंदकांत  खैरे पडले.  हा  त्यांचा एकट्याचा पराभव नसून माझाही आहे.  मात्र,  मी संभाजीनगर सुटू देणार नाही. पुन्हा संभाजीनगरवर भगवा फडकवणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांना अन्न धान्य वाटपाच्या कार्यक्रमात श्री ठाकरे बोलत होते.  यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा प्रमुख भास्‍कर अंबेकर, ए.जे. बोराडे, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदींची उपस्थिती होती. 

ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचे मत आणि आशिर्वाद घेऊन मी मोकळा झालेलो नाही.  दुष्काळात जनतेला आधार देण्याची जबाबदारी पार पाडण्याचे ओझे माझ्यावर आहे. दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. पीक विमा भरूनही नुकसानीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना  आपल्या  मंत्र्यासह पदाधिकाऱ्यांना देत  शेतकऱ्यांची  फसवणूक करणाऱ्यांना सरळ करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रस्‍तावीक करताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले की संकटाच्या काळात शिवसेना नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमातून आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांच्या  कर्जमुक्तीसाठी  सेनेनेच आग्रह धरल्यामुळे त्याची व्याप्ती व मुदत वाढविण्यात आल्याचे खोतकर म्हणाले. यापुढेही शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही ते म्हणाले. यावेळी जयदत्त क्षिरसागार, मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com