Uddhav Thakre"s directive flouted by Shiv sena corporaters in Navi Mumbai | Sarkarnama

उध्दव ठाकरेंच्या आदेशानंतरही शिवसेनेत मनोमिलाफाला ‘फाटा’

संदीप खांडगेपाटील
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी  मुंबई :  नवी  मुंबई  महापालिका  स्थायी समिती  सभापती व सदस्य निवड अवघ्या आठवड्याभरावर आलेली  असताना शिवसेनेतील मतभेद व अर्ंतगत यादवी पुन्हा  उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

नवी  मुंबई :  नवी  मुंबई  महापालिका  स्थायी समिती  सभापती व सदस्य निवड अवघ्या आठवड्याभरावर आलेली  असताना शिवसेनेतील मतभेद व अर्ंतगत यादवी पुन्हा  उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी  मुंबईतील शिवसेना  नगरसेवकांची  मनोमिलाफाबाबत  ‘कानउघडणी’करूनही नवी मुंबईतील शिवसेनेमध्ये गटबाजी आजही  कायम आहे. उध्दव ठाकरेंच्या मनोमिलाफाच्या आदेशाला नवी  मुंबईतील  शिवसेना  पदाधिकारी व  शिवसेना नगरसेवक ‘फाटा’ देत  असल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.
महापालिकेची  पाचवी सार्वत्रिक निवडणूक  एप्रिल २०१५ मध्ये झाली. निवडणूक होण्याच्या अगोदरच तीन महिने विजय चौगुले  यांनी नवी  मुंबई शिवसेना  जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून नवी   मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख पद आजतागायत रिक्तच आहे.  यापदाकरिता बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोेरे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, नामदेव भगत, विरोधी पक्षनेते  विजय चौगुलेंसह अनेक नावे  चर्चेत  असली  तरी  मातोश्रीने जिल्हाप्रमुख निवडीबाबत विशेष स्वारस्य न दाखविल्याने या  पदावर कोणाची  नियुक्ती झाली नाही.

जिल्हाप्रमुख पद रिक्त झाल्यावर नवी मुंबई शिवसेनेचा  गाडा खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे  आणि  उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली हाकला जात आहे. या त्रिमूर्तीच्या नेतृत्वाखाली  लढविलेल्या महापालिका  निवडणूकीत शिवसेनेचे ३८ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेत गटबाजी असल्याने  पालिका  मुख्यालयात  शिवसेना  कधीही  एकसंध  पहावयास मिळाली  नाही.

शिवसेनेच्या शिवराम पाटील यांनी कॉंग्रेसच्या स्थायी समिती सदस्या मिरा  पाटील यांना आपल्याकडे  वळवित राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाची धूळ  चारत स्थायी समितीचे  सभापतीपद मिळविले. शिवसेनेकडे सध्या विरोधी पक्षनेते व  स्थायी समिती  सभापती पद  असले तरी ही  पदे भूषविणार्‍या विजय चौगुले व  शिवराम पाटील  यांच्यामध्ये फारसे ‘सख्य’ नसल्याचे अनेकदा पहावयास मिळाले  आहे.

मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प वाचन करताना स्थायी  समिती  सभापती शिवराम पाटील यांनी विरोधी  पक्ष नेते विजय चौगुले यांचा उल्लेख न केल्याने शिवसेना वर्तुळात गदारोळ  निर्माण झाला. चौगुले समर्थक नगरसेवकांचे पालिका सभागृहात  प्राबल्य असल्याने या असंतोषाची मातोश्रीलाही  दखल घ्यावी  लागली. मातोश्रीने तात्काळ बैठक आयोजित करून उध्दव ठाकरे यांनी नगरसेवकांची कानउघडणी करत मनोमिलाफ करण्यास  सांगितले. यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले आहे.उध्दव ठाकरे यांनी आदेश देवून आता महिना उलटत आला असला तरी शिवसेना नगरसेवकांची मनोमिलाफाकरता बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. गटबाजी  आजही कायम आहे.

स्थायी समितीमधून शिवसेनेचे ५ नगरसेवक निवृत्त होत असून त्याजागी शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्थायी समितीवर जाण्याकरिता शिवसेनेचे अनेक नगरसेवक इच्छूक असून त्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. इच्छूकांनी विजय चौगुलेंपासून गटनेते द्वारकानाथ भोईरांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदेपर्यत आपल्या इच्छा व्यक्त केल्या असून कोणी त्यासाठी लेखी निवेदनही सादर केले  आहे. दुसर्‍यांदा शिवसेनेतून निवडून आलेल्यांना संधी देण्यात यावी, कॉंग्रेसमधून आलेल्यांचा लगेच विचार करू नये असा सूर शिवसेनेतील नगरसेवकांकडून आळविला जावू लागला आहे.

पालिका निवडणूकीच्या अगोदर काही दिवस कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या  नामदेव भगत आणि रंगनाथ औटी यांचे नाव निश्‍चित झाल्याचे वृत्त शिवसेना वर्तुळात पसरताच शिवसेना नगरसेवकांमध्ये नाराजीचे व संतापाची भावना व्यक्त  केली जावू लागली आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेनेत अर्ंतगत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा फटका ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या महापौर निवडणूकीवर बसण्याची भीती शिवसेना पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केली जावू लागली आहे. स्थायी समिती सदस्य निवड खा. राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपनेते विजय नाहटा यांच्यासाठी ‘डोकेदुखी’ बनणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा युती होण्याची  शक्यता नसल्याने स्थायी समिती सदस्य निवडीत आपला विचार खासदारांनी न केल्यास आपणही त्याचा लोकसभा निवडणूकीत आपल्या प्रभागामध्ये विचार करणार नसल्याचा इशारा काही नगरसेवकांनी खासगीत बोलताना दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख