पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर डासांनी काय करायचे - उद्धव ठाकरे

डासांचं आयुष्य सात दिवसाचे असते. पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर डास काय करतील? - उद्धव ठाकरे
पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर डासांनी काय करायचे - उद्धव ठाकरे

मुंबई : 'सायलेंस झोन आणि स्मशान शांततेत काय फरक आहे, सायलेंस झोन संदर्भात मागच्या वर्षी मुख्यमंत्र्याना भेटलो होतो या वर्षी भेटणार नाही. आम्ही अतिरेक करणार नाही, तुम्ही सुद्धा नियमांचा अतिरेक करू नका,' असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. रंग शारदा बांद्रा येथे मुंबई गणेश उत्सव समन्वय समिती बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मुंबई शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मूर्तिकार यांच्या रंगशारदा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ''उत्सवाचे दिवस आता सुरू होत आहे पाऊस पडणार की नाही. आपला उत्सव ही वाजत गाजत होणार की नाही, असे प्रश्न पडत आहेत. पावसाचे आपल्या हातात नाही पण आपला उत्सव वाजत गाजत होणारच. आज जो विषय आहे तो गणेशउत्सवाचा आहे, तसाच पावसामध्ये उद्भवणाऱ्या रोगांचा ही आहे.'' मदतीसाठी जो धावून जातो, प्रसंगी प्राणाची बाजी लावतो तोच शिवसैनिक असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपावर उद्धव ठाकरे यांची नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ''आम्ही स्वतःला पहारेकरी नाही समजत नाही, आम्ही पहिले मुंबईकर आहोत. आम्ही नुसते दंड थोपटत नाही बसत. व्यवस्थित सांगितले तर लोक ऐकतात. पण दंडुका आवळला की मग तो आपण मोडून काढतो.''

हिंदू संकट आल्यावर हिंदू एकत्र येतो एरवी का नाही असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ''आरतीचा त्रास होतो, पण बांगेचा होत नाही. हिंदू सहिष्णु आहे म्हणून त्यांच्या बाबत बोलायची हिम्मत नाही. आमच्याच हिंदुस्थानामध्ये आमच्याच देवांना अतिरेक्यांच्या धमक्या. हे एवढं दारिद्र्य आहे का अन्य कोणत्या देशात? आज गणपती मंडळांना याचसाठी बोलावले आहे. टिळकांनी त्या वेळी जे करून दाखवलं ते आपण आता एकत्र येऊन करून दाखवायला हवे.''

''क्रिडा आणि धर्म एकत्र आणू नका असे सल्ले दिले जातात कला आणि धर्म एकत्र आणू नका म्हणतात. आता धर्म आणि दहशतवाद एकत्र आला आहे. जा आता तिथे आणि सांगा. गोरक्षक पाठवा तिथे,'' असा चिमटाही ठाकरे यांनी हिंदूत्ववाद्यांना काढला. काश्मीरप्रश्ना बद्दल अतिरेक्यांशी बोलू शकता तर माझ्या गणेश मंडळाशी नक्कीच बोलू शकता, असेही ठाकरे यांनी यावेळी सुनावले. देव पावतो की नाही हा ज्याचा त्याचा विषय आहे, असे सांगत मंत्रालयापेक्षा मंदिरात आज जास्त गर्दी असते असा टोमणाही ठाकरे यांनी लगावला.

सुधीर मुनगंटीवार यांचा झाडे लावण्याचा कार्यक्रम चांगला आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली आहेत ती झाडे आपण तोडतो त्याचं काय?असा प्रश्न विचारत मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांची पुन्हा नाव न घेता भाजप सरकारवर टीका केली. पाच दिवसांचा आठवडा करण्यावरूनही उद्धव यांनी खोपरखळी मारली. ते म्हणाले, ''डासांचं आयुष्य सात दिवसाचे असते. पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर डास काय करतील?''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com