उद्धव ठाकरेंनी नगर दक्षिणचा पत्ता अखेर उलगडलाच नाही

शिर्डीला लोकसभेच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे जाहीरपणे बोलले, मात्र नगर दक्षिणेच्या उमेदवारीबाबत त्यांनी माैन बाळगले. ते काहीतरी बोलतील, यासाठी इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले, पण ठाकरे यांनी संबंधित उमेदवारांच्या दृष्टीने नाव घेवून साधा इशाराही केला नाही.
उद्धव ठाकरेंनी नगर दक्षिणचा पत्ता अखेर उलगडलाच नाही

नगर : शिर्डीबरोबरच नगरला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारीबाबत उघडपणे संकेत दिले. पण नगर दक्षिणची उमेदवारी कोणाला देणार, हा पत्ता मात्र ठाकरे यांनी अखेरपर्यंत उलगडला नाही.

शिर्डीला लोकसभेच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे जाहीरपणे बोलले, मात्र नगर दक्षिणेच्या उमेदवारीबाबत त्यांनी माैन बाळगले. ते काहीतरी बोलतील, यासाठी इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले, पण ठाकरे यांनी संबंधित उमेदवारांच्या दृष्टीने नाव घेवून साधा इशाराही केला नाही. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, हे कोडेच राहिले.

लवकरच होणाऱ्या महापालिकालोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व होते. भाजपने थेट पंतप्रधानांना शिर्डी येथे बोलावून शक्तीप्रदर्शन केले. त्यावर कडी करीत शिवसेनेनेही आपल्या पक्षप्रमुखांना बोलावून आज मेळाव्यांच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली. मेळाव्याला गर्दी भरपूर होती. मंडप खचाखच भरला होता. जिल्हाभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरे यांचा जयघोष करीत नगर शहरात येवून धडकले. एक वाजता सुरू होणारी सभा अडीच वाजता सुरू झाली. सभेला महिलांची उपस्थिती पुरुषांइतकीच होती. 

सभेला गर्दी जमविण्याची जबाबदारी दक्षिणेतून माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर असली, तरी लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले श्रीगोंद्यातील नेते घनःश्याम शेलार, विजय आैटी यांच्यापुढेही मोठे आव्हान होते. लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत ठाकरे काहीतरी बोलतील, किमान इशारा तरी करतील, अशी आशा उपस्थितांना होती, मात्र तसे काहीच झाले नाही. राज्य पातळीवरील विषयांबरोबरच नगरचे छिंदम प्रकरण, भाग्यश्री मोकाटेला न्याय, महापालिकेवर भगवा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि उज्ज्वला गॅसचा फुगा हे विषय घेवून ठाकरे यांनी विरोधकांवर विशेषतः भाजपवर जोरदार टीका केली. मात्र, नगर दक्षिणच्या उमेदवारीचे गूढ कायम ठेवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com