sarkarnama exclusive उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी औरंगाबादचे `संभाजीनगर` करणार..

...
uddahv thackray to rename aurangabad
uddahv thackray to rename aurangabad

औरंगाबादः मनसेचे आमदार राजू पाटील हे नवीन आमदार आहेत, त्यांना या शहराबद्दल फारशी माहिती नाहीये. या शहारचे संभाजीनगर असे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत तेव्हाच केले होते. शिवसेना आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारी धर्माभिमानी जनता देखील शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करते. 

नामकरणाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील आतापर्यंतच्या संपुर्ण प्रक्रियेची माहिती मागवून घेतली आहे. कुठल्याही क्षणी "संभाजीनगर' असे नामकरण करण्यात आल्याची घोषणा त्यांच्याकडून होऊ शकते. त्यासाठी मनसेची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेने केलेल्या मागणीची खिल्ली उडवली. 

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात आलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी औरंगाबाद शहारचे संभाजीनगर असे नामकरण करा अशी मागणी केली. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना मनसेच्या मागणीवर टिका करतांना संभाजीनगरचा निर्णय उध्दव ठाकरे कुठल्याही क्षणी जाहीर करतील असे म्हणत मनसेला फटकारले. 

चंद्रकांत खैरे म्हणाले, संभाजीनगरचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारच्या दरबारी पडून आहे. अगदी केंद्रात एनडीएचे सरकार असतांना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे देखील मी या संदर्भात पाठपुरावा केला होता. तेव्हा पुर्ण बहुमताचे सरकार केंद्र आणि राज्यात येऊ द्या, मग यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगतिले होते. 

2014 मध्ये राज्यात आणि केंद्रात बहुमतासह युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांच्या माध्यमातून मी नामकरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पण भाजपने टोलवाटोलवी केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयाला बगल देत वेळकाढूपणा केला. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे संभाजीनगर होऊ शकत नाही हा जावईशोध लावणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम नाही का? ते यात अडचण निर्माण करतील असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडून संभाजीनगरच्या नामकरणाच्या प्रस्तावाची सर्व माहिती मागवून घेतली आहे. कोणत्याही क्षणी या संदर्भातील निर्णय ते जाहीर करतील, तेव्हा मनसेने याची काळजी करू नये असा टोला देखील चंद्रकांत खैरे यांनी लगावला. 

हर्षवर्धन जाधव उडाणटप्पू .. 

शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा उल्लेख उडाणटप्पू असा करत खैरे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा टिका केली. जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही, तो या शहराचा काय होणार? असा प्रश्‍न उपस्थित करतांनाच शिवसेनेत असतांना संभाजीनगर उल्लेख झाला की हा आमच्यावर टिका करायचा. मग आज कुठल्या तोंडाने मी औरंगाबादचे संभाजीगनर करा अशी मागणी करणार असल्याचे सांगत आहे असा सवालही खैरे यांनी केला. 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येत आहेत. नेहमी भूमिका आणि धोरण बदलणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादचे लोक कितपत विश्‍वास ठेवतील हे देखील बघावे लागेल असा चिमटा देखील खैरे यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com