राज्य कर्मचाऱ्यासाठी पाच दिवसांचा आठवडा : उद्धव ठाकरेंनी दिले हे आदेश

....
uddahv thac
uddahv thac

मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. यावेळी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुलथे यांनी महासंघाच्या विविध मागण्या मांडल्या. केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीवर मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शासन विचाराधीन आहे. 45 मिनिटे वाढवून, अत्यावश्‍यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा. त्यावर निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्‍य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वेतन त्रुटीबाबत खंड -2 अहवाल तातडीने सादर करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर हा अहवाल महिन्या दीड महिन्यात सादर केला जाईल, असे कुंटे यांनी यावेळी सांगितले. महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

करोना व्हायरस : 21 पैकी 19 जणांना घरी सोडले : आरोग्यमंत्री

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सध्या राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणाखाली असून 19 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 12 हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत 107 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 21 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी 20 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून उरलेल्या एक जणाचा प्रयोगशाळा निकाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. 21 पैकी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे येथील नायडू रुग्णालयात 1 आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 जण भरती आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांसाठी करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 107 प्रवाशांपैकी 39 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळावर आरोग्य अधिका-यांच्या मदतीला कालपासून राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 10 वैद्यकीय अधिकारी आणि 15 आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com