भाजपशी युती तोडताना दुःख झाले : उद्धव ठाकरे 

भाजपशी युती तोडताना दुःख झाले : उद्धव ठाकरे 

नगर :  "" ज्या शिवसेनेने भाजपला संकटाच्या काळात साथ दिली. कडव्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर पहाडासारखा मागे उभा राहिला, त्या पक्षा भाजपने सुखाच्या काळात बाजुला टाकले. पंचवीस वर्षे सोबत होतो. त्यामुळे काही नेत्यांशी ऋणानुबंध झाले होते. साहजिकच युती तुटताना यातना झाल्या, दुःख झाले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत भाजपशी युती तोडतानाचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. 

ठाकरे म्हणाले, ""पंचवीस- तीस वर्षे आम्ही भाजपसोबत जरूर होतो. हा काही खेळ नाही. हा केवळ राजकारणातील अपरिहार्यता म्हणून नव्हतो, तर त्या नेत्यांमधील आमचे एक वेगळे नाते झाले होते. प्रमोदजी, गोपिनाथजी, अडवानीजी, अटलजी, नितीनजी यांच्यासोबत वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले होते. ते तुटताना यातना झाल्या. परंतु जो माणूस संकटाच्या वेळी पहाडासारखा उभा राहिला, 

हिंदुत्त्वावरील सर्व धोके स्वतःभोवती घेतले, त्या शिवसेनेप्रमुखांच्या पक्षासोबत त्यांनी विश्वासघात केला. कडवट हिंदुत्त्ववादी पक्षाला दूर ढकलल. पण नको त्या पक्षांना जवळ घेतले. त्यांचे कडवट विरोधक असलेल्यांना त्यांनी मांडीवर घेतले, परंतु जो संकट काळात सोबत होते, त्यांना बाजुला टाकले. संपूर्ण देशात त्यांना स्थान नसताना शिवसेनाप्रमुखांनी साथ दिली होती. त्यांना आता सुखाच्या काळात दूर ढकलले, याचे वाईट वाटते."" 

भाजपचे दरवाजे बंद 
भाजपसाठी दरवाजे बंद केले असले, तरी खिडकीची फट कुठे उघडी आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ""अशी खिडकीची फट वगैरे नाही, जे करायचे ते दिलखुलासपणे करायचे. दरवाजे बंद करण्याच्या आधी ते दरवाजाबाहेर गेलेच का,"" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. 

आम्ही कोणाचे गुलाम नाहीत 
पंचवीस वर्षे युती सडली ही आपली भूमिका होती, त्यातून आता बाहेर पडलात पण युती नसताना 63 आमदार स्वबळावर निवडून आणले. युती झाल्यानंतर हा आकडा घसरून 56 वर आलात, याची मिमांसा कशी कराल, या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ""त्याची मिमांसा हे फक्त अंदाज आणि तर्क होऊ शकतात.

युतीत भाजप व शिवसेनेचाही आकडा घसरला. तरीही त्यांनी शंभरी पार केली. निवडणुकीत अनेक मतमतांतरे आहेत. आमच्याकडे 144 जागा हव्या होत्या. हिंदुत्त्वासाठी आम्ही 124 घेतल्या. मान सन्मानाने राहून थोडेसे कमी आम्ही घेऊ परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांचा गुलाम म्हणून राहायचे. केवळ हिंदुत्त्वासाठी आम्ही कोणाची धुनीभांडी नाही करणार"" 

मोदी, सोनियांनाही भेटणार 
मुख्यमंत्र्यांनी थपथ घेतली, की परंपरेनुसार त्यांना दिल्लीला जावे लागते, तुम्ही अजूनही दिल्लीत गेले नाहीत, याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ""असे काही नाही. अशी काही जबरदस्ती नाही. दिल्लीचा काही राग नाही.

आवश्‍यकतेनुसार दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटेन, सोनिया गांधींना तसेच मोठ्या नेत्यांना भेटेन. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान झालेली व्यक्ती भविष्यात पुढील राष्ट्रीय राजकारणात जातात, याबाबत काही विचार केला नाही. केवळ शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविणे हेच माझे स्वप्न होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com