ठाकरे सरकारने रचला असाही इतिहास!

नागपूरचे हिवाळी अधिवेशन जवळ आले तरी साधे खातेवाटपही अद्याप या सरकारने केलेले नाही.
Uddhav thackrey-devendra fadanvis
Uddhav thackrey-devendra fadanvis

मुंबई ः मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 13 दिवस उलटले, तरी अद्यापपर्यंत खातेवाटपाला मूहूर्त सापडला नाही. ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असून, खातेवाटपही तातडीने करण्यात आले होते.

1999 मधील निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा शपथविधी दहा दिवस लांबला होता. त्याच वर्षी शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्या वेळी दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना-भाजप युतीत एकमेकांच्या जागा पाडापाडीचा खेळ झाल्याने युतीच्या जागा सरकार बनविण्यासाठी कमी पडत होत्या. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या प्रचंड दबावामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्या सरकारमध्ये शेकाप आणि रिपब्लिकन पक्षाचाही समावेश करण्याचा निर्णय झाल्यावर जंबो मंत्रिमंडळ तयार झाले होते. त्यामुळे आघाडी सरकारचा शपथविधी तीन टप्प्यांत पार पडला होता आणि खातेवाटपही लगेच करण्यात आले होते.

यंदा सरकार स्थापन करण्यास बराच उशीर झाला. मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या प्रक्रियेला निकालानंतर जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला. विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्‍टोबरला लागला असताना, ठाकरे सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीला आज 13 दिवस उलटले असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. ही घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातून सांगण्यात आले.

1999मधील घटनाक्रम

7 ऑक्‍टोबर
निवडणूक निकाल जाहीर

18 ऑक्‍टोबर
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी

19 ऑक्‍टोबर
मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खातेवाटप

27 ऑक्‍टोबर
मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आणि खातेवाटप

फडणवीस यांची टीका

मंत्रिमंडळ विस्तार नाही. खातेवाटप नाही. अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. नागपूर अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी खातेवाटप झाले नाही, तर उत्तरे कोण देईल, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अधिवेशन म्हणून सरकारची फक्‍त औपचारिकता सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com