कर्जमाफी केवळ प्रथमोपचार, बळीराजाला स्वतःच्या पायावर उभे करायचे : उद्धव ठाकरे

मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या वेळी बोलताना त्यांनी शेतीविषयक धोरणांबाबत आपले मत व्यक्त केले
Uddhav Thackeray Explains Agriculture Policies
Uddhav Thackeray Explains Agriculture Policies

नगर : ''शेतकरी हा अन्नदाता आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. त्याला कर्जमाफी देऊन हा केवळ प्रथमोपचार केला आहे. तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहिल, यासाठी आगामी काळात लक्ष दिले पाहिजे,'' असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली. या वेळी बोलताना त्यांनी शेतीविषयक धोरणांबाबत आपले मत व्यक्त केले. 

ठाकरे म्हणाले, ''शेतकऱ्यांना विविध योजनांची गरज आहे. गोडावून, शितगृहे आवश्यक आहेत. आम्ही शेतीविषयक काहीही निर्णय घेतले, तरी विरोधक बोंबलत बसणारच आहेत. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. त्यासाठी एकाही शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. मार्चपासून मात्र दोन लाखांवरील कर्जमुक्ती करणार आहोत. त्यासाठीही खास योजना तयार आहे,'' असा दिलासा त्यांनी दिला.

पंकजा मुंडेंनी मांडलेला प्रश्न मार्गी लावणार

पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या पाणी प्रश्नांबाबत तो मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मराठवाड्याला पाण्याच्या प्रश्नाबाबत गंभीर आहोत. त्याबाबत नुकतीच बैठकही घेतली आहे. विदर्भातही अशा बैठका घेतल्या आहेत. विविध भागात बैठका घेऊन पाण्याचे प्रश्न मार्गी लावणार आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.

पांढरे हत्ती कशासाठी 

राज्याची आर्थिक स्थिती पाहून कामांमधील प्राथमिकता ठरविली पाहिजे. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, या विषयी चर्चा करणे गरजेचे आहे. केवळ पांढरे हत्ती पोसणे योग्य नाही. सरकारचे काम विकास करणे आहे. पैशाचा वापर योग्यपद्धतीने होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करून ठाकरे यांनी बुलेट ट्रेनबाबत मत मांडले.

कर्जाचे आव्हान स्विकारले

महाराष्ट्रावर कर्जाचा मोठा बोजा आहे. ते आव्हान आम्ही स्विकारले आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या रुपात येणारा परतावा अद्याप आला नाही. केंद्राकडून राज्यात येणाऱ्या निधीमध्ये दिरंगाई होत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. आपल्या राज्यातील उद्योगपतींना विश्वासाने कोणी बोलत नव्हते. मी या सर्व उद्योजकांना विश्वास दिला आहे. त्यामुळे तेही गुंतवणुकीस तयार होत आहेत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

हे देखिल वाचा -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com