Uddhav parts away from the tradition and attends NDA meeting | Sarkarnama

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहत सेनेच्या परंपरेला दिला छेद 

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 एप्रिल 2017

उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहत सेनेच्या परंपरेला दिला छेद दिला. यापूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला दिल्लीश्वर मातोश्रीवर येत असत. त्यानंतर एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा होत असत.

मुंबई : शिवसेनेच्या परंपरेला फाटा देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडीच्या बैठकीला दिल्लीत उपस्थिती लावली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार निवडीला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे भाजपच्या दिल्ली दरबारात शिवसेनेने सामंजस्याची  भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

गेल्या गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा यावर बैठकीत चर्चा होणार असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना एनडीएच्याबैठकीचे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहत सेनेच्या परंपरेला दिला छेद दिला. यापूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला दिल्लीश्वर मातोश्रीवर येत असत. त्यानंतर एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा होत असत. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुख राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीच्या बैठकीला दिल्लीत जात आहेत.

 महाराष्ट्रातील सत्तेत छोट्याभावाची भूमिका निभवणाऱ्या शिवसेनेने शेतकरी कर्जमाफी वरून भाजपला चांगलेच कोंडीत पकडले होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शिवसेनेच्या आमदारांनी सरकारविरोधी गोंधळ घालत कामकाज रोखून धरले होते. भाजपने सरकार पडण्याची शक्‍यता लक्षात घेता विरोधी पक्षातील काही आमदार गळाला लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने शिवसेनेने आपल्या विरोधाची धार कमी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मूक संमतीने कर्जमाफीचा विषय गुंडाळत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या गुंतवणुकीचे गाजर दाखवत सेना आमदारांची भलापण करण्यात भाजप यशस्वी झाली. तरीही शिवसेनेच्या गोटातून सरकारविरोधी सुर आवळण्यात येत होता. मात्र, भाजपच्या चाणक्‍यांनी सेना प्रमुखांची समजूत काढत अधिवेशन गुंडाळले. यामुळे राज्यातील विरोधी पक्षासह अनेक राजकीय पंडितांनी शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती.

 त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना भाजपच्या आमदारांच्या तुलनेत विकासनिधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. शिवसेनेच्या आमदारांना निधीच्या वाटपात डावलेले जात असल्याची तक्रार सेना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली होती. त्यानुसार आपली नाराजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोन करून व्यक्त केली होती. शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर,ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, यांच्यासह आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मात्र आश्वासनाशिवाय या शिष्टमंडळाला काहीच मिळाले नव्हते. यामुळे उद्धव ठाकरे आपली नाराजी व्यक्त करत बैठकीला जाण्याची टाळतील अशी शंका व्यक्त केली जात होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख