मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? - उद्धव ठाकरे - Uddhav Criticises CM over Farmers Strike | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

चळवळे व आंदोलक लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे फुसके आपटी बार करायचे. रामदास आठवले वगैरेंची फुसकुली काँग्रेसने केली तशी फडणवीस यांनी सदाभाऊंची केली.' जादूगार कबुतराची कोंबडी करतो किंवा सशाचे मांजर करतो हे माहीत होते, पण फडणवीस यांनी विंचवाचे साफ झुरळ करून टाकले - उद्धव ठाकरे

मुंबई - शेतकरी नेत्यांशी फक्त सरकारातील खऱ्या शेतकऱ्यांनीच बोलावे! तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा प्रश्न विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'उगाच शेतकरीकल्याणाच्या गप्पा मारू नका!' असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखामध्ये 'हरकतीचा मुद्दा' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या खरा शेतकरी खोटा शेतकरी या विधानाचा चांगला समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे सामनात म्हणतात, 'राजू शेट्टी यांनी असे ठणकावले आहे की, सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चात्ताप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच सरकारमधून बाहेर पडू असेही त्यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या संपास आणि ‘महाराष्ट्र बंद’ला प्रचंड यश मिळाले आहे. त्यानंतर राजकीय जोडे बाजूला काढून शेतकरी संघटनांचे अनेक जुनेजाणते पुढारी एकत्र आले आहेत. 'फोडा, झोडा' नीतीचा प्रयोग करूनही तो यशस्वी झाला नाही. नेत्यांत मतभेद असले तरी शेतकरी एकवटला व सरकारला घाम फोडला हे महत्त्वाचे.' आता पुढे काय? हाच प्रश्न असला तरी एकत्र आलेल्या शेतकरी नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाऱ्यांप्रमाणे वागू नये, असा सल्लाही ठाकरे यांनी शेतकरी नेत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील फडणवीस सरकार काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणतात, 'चळवळे व आंदोलक लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे फुसके आपटी बार करायचे. रामदास आठवले वगैरेंची फुसकुली काँग्रेसने केली तशी फडणवीस यांनी सदाभाऊंची केली.' जादूगार कबुतराची कोंबडी करतो किंवा सशाचे मांजर करतो हे माहीत होते, पण फडणवीस यांनी विंचवाचे साफ झुरळ करून टाकले असल्याचा टोलाही ठाकरे यांनी सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.  

ठाकरे पुढे म्हणतात, 'हा जादुई प्रयोग शरद पवारांनाही जमला नसता. ‘एखाद्याने इतकेही स्वतःला बदलू नये की, त्याचा सदाभाऊ होईल’ असे टवाळकीने का म्हटले जात आहे याचा विचार सत्तेच्या कच्छपि लागलेल्या चळवळ्यांना आता करावाच लागेल.' महादेव जानकरांची सध्याची राजकीय अवस्था काय आहे हे ते स्वतःदेखील सांगू शकणार नाहीत, असा चिमटा काढत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मित्र पक्षांनाही चांगलेच चिमटे काढले आहेत.

‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ या ऐतिहासिक सत्याची चाड महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ठेवायला हवी. 'कर्जमाफी करणार नाही' असे सांगणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य या काय नऊवारी साडी व नाकात नथ घालून स्टेट बँकेच्या खुर्चीवर बसल्या आहेत काय? मोबाईलचे बिल भरायला पैसे आहेत, पण विजेचे बिल भरायला शेतकरी टाळाटाळ करतो अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना असेही विचारता येईल की, 'बाबांनो, निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता खेचण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करता ना, मग कर्जमुक्तीसाठी का रडता?' शेतकरी रस्त्यावर उतरला म्हणून त्याच्याशी सूडाने वागाल तर याद राखा! असा दमही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख