बुद्धिबळाच्या पटावर मी फुटबॉल खेळणार नाही : उद्धव ठाकरे

 बुद्धिबळाच्या पटावर मी फुटबॉल खेळणार नाही : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : "" महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. शिवसेनेने त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली; मात्र मित्राचा त्यांनी घात केला. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही,'' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारी (ता. दहा) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बदल्या, बढत्यांसाठी माझ्याकडे येऊ नका, असे फर्मानही त्यांनी यावेळी सोडले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ""आता नवीन घरोबा झाला आहे. हा घरोबा करताना तुमच्याप्रमाणे माझी मानसिकताही संमिश्र होती; पण एका बाजूला साखरेला लावलेले विष आणि दुसऱ्या बाजूला नुसतेच विष ठेवलेले असेल तर काय करणार ? भगवान शंकरानेसुद्धा हलाहल पचवलेच होते, आम्हीही पचवू. नवी आघाडी केली याचा अर्थ आम्ही हिंदुत्व सोडले असा नाही. हिंदुत्व सोडणार नाही, हातातला भगवा सोडणार नाही. ते मुफ्ती महंमदसोबत जाऊ शकतात; मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मीसुद्धा बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही,'' असा टोला ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. 

""पुढील निवडणुकांचा आराखडा तयार करा, राजकीय चाणाक्षपणा आपल्याकडे असला पाहिजे,'' असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्याची तयारी करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मराठवाडा विभागातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मिळेल ती खुर्ची घ्या 

उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार उशिराने आले. त्यांना व्यासपीठावर खुर्ची नव्हती. काहींनी त्यांना खुर्ची देण्यासाठी धावपळ सुरू केली. हा प्रकार पाहून ठाकरे यांनी, सत्तारांना उद्देशून आणि शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे पाहत, मिळेल ती खुर्ची घ्या आणि बसा, खुर्चीवरून उगीच वाद नको, असे ठणकावले. 

बदल्या, नोकरीची शिफारस घेऊन येऊ नका 
तुमच्यामुळेच शिवसेनेला आज हे दिवस दिसत आहेत. संघटनेसाठी काम करीत असताना आपले घर, प्रपंचसुद्धा व्यवस्थित चालावा यासाठी उद्योग, संस्था उभारा, स्वतःही सक्षम व्हा आणि इतरांना रोजगार द्या; मात्र मुंबईत माझ्याकडे नोकरीची शिफारस किंवा बदल्यांसाठी येऊ नका, असे फर्मान ठाकरे यांनी सोडले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com