बंडखोरांकडे कानाडोळा करीत उध्दव ठाकरेंनी नाशिक सोडल्याने भाजपमध्ये चिंता

शहरातील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकाविल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समोर सोक्षमोक्ष लागेल, अशी अपेक्षा भाजपला होती मात्र, ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोरांशी चर्चा न करताच नाशिकचा मुक्काम हलविताना महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांना दोन दिवस थांबण्याचा सल्ला संपर्क प्रमुखांनी दिल्याने भाजपची डोकेदुखी तर वाढली आहे. यानिमित्ताने बंडखोरीला शिवसेनेतूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.​
Uddhav Thakare
Uddhav Thakare

नाशिक : शहरातील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकाविल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समोर सोक्षमोक्ष लागेल, अशी अपेक्षा भाजपला होती मात्र, ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोरांशी चर्चा न करताच नाशिकचा मुक्काम हलविताना महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांना दोन दिवस थांबण्याचा सल्ला संपर्क प्रमुखांनी दिल्याने भाजपची डोकेदुखी तर वाढली आहे. यानिमित्ताने बंडखोरीला शिवसेनेतूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने हा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेला सोडावा अशी मागणी होती. मात्र, भाजपने ही जागा न सोडल्याने ताकद असूनही शहरातून शिवसेना हद्दपार होण्याची भिती व्यक्त करत महापालिकेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांनी शिवसेनेच्या 22 नगरसेवकांचा देखील पाठींबा मिळवला. शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे यांच्या पाठीमागे उभे तर राहीलेच शिवाय प्रचाराला सुध्दा ताकदीने सुरुवात केल्याने भाजप मध्ये चलबिचल निर्माण झाली. 

त्या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्यांनी संपर्क नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेत युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला. खासदार राऊत यांनी शिवसेना नगरसेवकांची भेट घेत भावना जाणून घेत पक्ष प्रमुखांच्या कानावर सदरचा विषय घालण्याचे आश्‍वासन दिले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांचा शनिवारी रात्री मुक्काम होता. त्यावेळी बंडखोर उमेदवारासह नगरसेवकांची भेट घेणे अपेक्षित होते. मात्र, अशा प्रकारची कुठलीचं बैठक घेतली नाही. रविवारी सकाळी त्यांनी दुसऱ्या सभेसाठी नाशिक सोडले.

हिरेंची धावती भेट अन सल्ला
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी सकाळी महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे हॉटेलला पोहोचल्या. परंतु, घाईत असलेल्या ठाकरे यांच्याशी त्यांची धावती भेट झाली. सौ. हिरे यांनी तक्रारीच्या सुरात म्हणणे मांडल्यानंतर ठाकरे यांनी युती धर्माचे पालन करण्याचे आश्‍वासन दिले. तर संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दोन दिवस थांबण्याचा सल्ला दिल्याने तुर्त तरी बंडखोरीचे निशाण कायम राहीले. दुसरीकडे बंडखोर उमेदवारांचा आत्मविश्‍वास वाढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com