मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, रोहित तू काळजी करू नकोस! - uddahv thackray assuerd rohit pawar on recruitment | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, रोहित तू काळजी करू नकोस!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 13 मार्च 2020

...

पुणे : राज्यातील तरुणांच्या सरकारी भरतीचा विषय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लावून धरला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ही भरती आॅफलाइन करण्याचा शब्द ठाकरे यांनी रोहित यांना दिला आहे. तसे रोहित यांनी जाहीर केले आहे.

राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आधीच्या 'महापोर्टल'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती, असे रोहित यांनी सांगितले.

``त्यानुसार काल मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांची वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत मला आश्वस्त केलं. ते म्हणाले, "रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल."

मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं, असे रोहित यांनी म्हटले आहे.

``तसेच पूर्वी महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि 'एमपीएससी'च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे मत रोहित यांनी व्यक्त केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख