महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्य बोलणारे निवडुन येतात हेच दुर्दैव : उदयनराजे

महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्य बोलणारे निवडुन येतात हेच दुर्दैव : उदयनराजे

कवठे (ता. वाई) : संगणक हॅक होऊ शकतो तर ईव्हीएम मशीन का होऊ शकत नाही. अपेक्षित नसलेला धक्कादायक निकाल लागला असला तरी त्यात ऍडजेस्टमेंट करुन निकाल लावला आहे. ज्या ठिकाणची जागा हमखास निवडून येणारी आहे तिथे त्यांनी काहीही बदल केलेला नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जर या निवडणुकीत निवडून येत असतील तर यासारखे मोठे दुर्दैव नाही, अशी टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

बोपेगाव (ता. वाई) येथे वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी उदयनराजेंनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतापराव पवार, उपसभापती अनिल जगताप, विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, सत्यजित वीर, रमेश गायकवाड, रवी जाधव, मनीष भंडारे, मधुकर भोसले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

उदयनराजे म्हणाले, आजचा सत्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. लोकसभा निवडणूकीत मदत केलेल्यांच्या गाठीभेटी घेतोय. हा लोकसभेचे निकाल अनपेक्षित होते. लोकशाहीत सगळे समान असतात. प्रत्येकाला कायदा वेगळा नसतो. गेल्या पाच वर्षात देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाहीच सुरु झाली आहे. मी याबाबत अनेकदा माझे मत व्यक्त केले आहे. निवडणूकीत इलेक्‍ट्रॉनिक प्रचार चालू असताना इतर पक्षांना बंधने घातली होती. मात्र, नमो टिव्हीच्या माध्यमातून यांचा प्रचार सुरु होता. दिवसभर तेच तेच दाखवूनही लोकांच्या मनावर परिणाम झाला नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. लोकांमध्ये उद्रेक होवू नये म्हणून एक्‍झिट पोल प्लॅनिंगने तयार करुन निकाल आधीच दाखवून दिले. निकाल लोकांच्या मनाविरुध्द लागल्यास कोठेही निदर्शने होऊ नयेत, हा एक्‍झिट पोल दाखविण्याचा त्यांचा मुलभूत हेतू होता. पण जनता काही मूर्ख नाही. शासनाच्या धोरणामुळे ज्या कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली, त्या कुटुंबातील एकतरी मत यांना मिळू शकते का? असे असतानाही त्यांना त्या कुटुंबाचे मतदान झाले आहे, या सारखी मोठी शोकांतिका होऊ शकत नाही असे ते म्हणाले. 


अमेरिका सारख्या देशानीही निवडणुकीत इव्हीएम मशीनचा वापर बंद करुन पूर्वीच्या पध्दतीप्रमाणेच मतपत्रिकांचा वापर सुरु केला आहे. या मतदानात तुम्ही कोणताही बाहेरुन बदल किंवा हस्तक्षेप करु शकत नाही. संगणकाएवढे इव्हीम मशीन अवघडपणे बनविले जात नाही. जर तुमचा संगणक हॅक करु शकता तर हे मशीन आहे. मोठ्या प्रमाणावर अपेक्षित नसलेला हा धक्कादायक निकाल लागला असला तरी त्यात ऍडजेस्टमेंट करुन निकाल लावला आहे, असे माझे मत आहे. ज्या ठिकाणची हमखास निवडून येणाऱ्या जागा आहेत तिथे त्यांनी काहीही बदल केले नाहीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अक्षेर्पाह वक्तव्य करणारे जर या निवडणूकीत निवडून येत असतील तर यासारखे मोठे दुर्दैव नाही. अत्यंत कडकोट बंदोबस्त असणाऱ्या राष्ट्रपती भवनातून महत्वपूर्ण अशी राफेलसारखी फाईल गायब होते. या फाईलच्या कपाटापर्यंत ज्यांना अधिकार आहेत असेच पोहचू शकतात. संपूर्ण खोटारडेपणा सुरु असून देश विकायला काढला आहे अशा आरोप त्यांनी केला. 


मोबाईलच्या टॉवरच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्‍ट चीनमधील कंपनीला दिले आहेत. भारताच्या इतिहासात असे पहिलेच पंतप्रधान आहेत की ज्यांची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था इस्त्रायलच्या मोझॅकची आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित हे मुद्दे आता डिक्‍शनरीतच पाहयाला मिळतात. ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला त्या अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांचीही यांनी फार दयनीय अवस्था करुन टाकली. लोकांच्या हितासाठी बऱ्याचवेळा माझ्यावर रोष व्यक्त होतो. पण त्याचा काही फरक पडत नाही. जे लोकांच्या हिताचे असेल ते मी बोलतो. मध्यप्रदेश, राजस्थान या दोन्ही राज्यांत कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता असतानाही त्यांना या राज्यांत एकही जागा मिळत नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मतदारसंघातील सर्व आमदार, स्थानिक स्वराज संस्थातील पदाधिकारी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, क्रिडा संस्था व आपण सर्वांनी मनापासून काम केल्यानेच मी हा विजय मिळवू शकलो असे ते म्हणाले. 

आमदार मकरंद पाटील म्हणाले, मोदी सरकारबद्दल लोकांच्यात प्रचंड नाराजी असूनही संपूर्ण देशात सर्वत्र धक्कादायक व अनपेक्षित लागले. सातारा मतदारसंघाबाबत अनेकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या होत्या. चुरस आहे असे भासविले जात होते. वाई विधानसभा मतदार संघाने तिन्ही तालुक्‍यातील कार्यकर्ते व जनतेने प्रंचड विश्वास दाखवून 32286 एवढे मताधिक्‍य दिले. छत्रपतींच्या घराण्याला साजेसे काम उदयनराजे करीत असून, सातारा मतदारसंघातील अडीअडचणी सोडवतील याबद्दल विश्वास असल्याचे सांगितले. 

मदतीची परतफेड करणार..... 
आमदार मकरंद पाटील यांनी लोकसभा निवडणूकीत जी मदत केली त्याची परतफेड वाट्टेल त्या परिस्थितीत करणार आहे. त्याबद्दल कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नका. चार महिन्यात आचारसंहिता लागू होईल. दिवस थोडे राहिले आहेत. निकाल काही लागला असला तरी खचून जायचे काही कारण नाही. तुम्ही फक्त बरोबर रहा. आबांना पहिल्यासारखीच खंबीर साथ द्या. आपण सगळी मिळून काय गेम करायची ती करु, माझ्याकडे बऱ्याच योजना असतात. जरी आम्ही दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असलो तरी लाईन दोरी तीच आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, असे उदयनराजेंनी यावेळी म्हणताच उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com