Udayanraje still believes feudal system : Jitendra Avhad | Sarkarnama

उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही संरंजामशाहीच : जितेंद्र आव्हाड 

सरकारनामा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

'ते' महाराज आहेत. कुणालाही मारू शकतात. आम्ही अजूनही सामान्य प्रजा आहोत. -जितेंद्र आव्हाड

सोमेश्वरनगर :  उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही संरंजामशाहीच आहे. जगात लोकशाही आहे, कायद्याने सर्वजण समान आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेव्दारे सर्वांना एका कक्षेत आणले आहे हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते अजूनही नाहीत. जनतेने पराभव केल्यानंतरही प्रजातंत्र सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येत नाही, अशी टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

करंजेपूल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी भेट दिली. सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या 'आशा' प्रकल्पाची माहिती व पुस्तके संचालक विशाल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी त्यांना भेट दिली. मराठा क्रांती मोर्चाने आव्हाड व खासदार संजय राऊत यांना 'ठोकून काढू' अशी धमकी दिली होती याबाबत आव्हाडांनी 'सकाळ'शी संवाद साधला.

'ते' महाराज आहेत. कुणालाही मारू शकतात. आम्ही अजूनही सामान्य प्रजा आहोत, असा उपरोध   आव्हाड यांनी केला. भाजप गोयल प्रकरणाशी संबंध नाही म्हणते तर जावडेकरांनी पुस्तक मागे घेण्याची घोषणा का केली? 

पुन्हा काल भाजपा आमदाराने 'मोदींमुळे शिवरायांची उंची वाढली' असे भाष्य केले. यावरून आरएसएसच्या कुशीत तयार झालेली फळी आणि भाजपाच्या मनातली महारांजांबद्दलची असूया लक्षात येते. यावर उत्तर द्यावे असे आव्हान दिले.

सीएए, एनआरसी हा बहुजनांविरूध्दचा डाव आहे. बेरड, बुरूड, पारधी, वडारी, वंजारी, जोशी, गोसावी अशा भटक्या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमीनीचा तुकडा नाही, वास्तव्याचा दाखला नाही त्यांचं काय करणार? घटनेवर चर्चेवेळी प्रास्ताविकेवर देवाचे नाव टाकून सुरू करण्याबाबत डॅा. राजेंद्रप्रसाद यांनी विरोध केला. वुई द पिपल... अशी सुरवात केली. 

पण अजूनही भाजपाला समाजव्यवस्था समजत नाही ते जातीयवाद करत आहेत. इंग्रज काळात फासेपारध्यांसाठी सेटलमेंट कँप होता आता त्यांच्यासाठी डिटेंशन कँप काढला जात आहे. सुब्रमण्यम स्वामींनी 'नोटेवर लक्ष्मी छापा' असे विधान करणे हा भाजपचा 'प्लॅन' आहे. तर योगेश सोमणांची हकालपट्टी करण्यास उशिरा झाला, असा टोलाही लगावला.

 'गृहनिर्माण' जिवंत करणार
देशाचं अर्थकारण डबघाईला गेल्याने 'बिल्डींग' उद्योगही अडचणीत आहे. यावर 268 प्रकारचे छोटे-मोठे व्यवसायिक जगतात. वेगवेगळ्या प्रयोगातून बिल्डर जिवंत ठेवून गरीबांना परवडतील अशी घरे देण्यासाठी व या इंडस्ट्रीला तीन महिन्यात सुगीचे दिवस आणण्यासाठीच साहेबांनी मला गृहनिर्माण दिले आहे. गरीबांच्या, मध्यमवर्गियांच्या घरांसाठी बँकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सरकार अर्थसंकल्पाच्या आधी नवीन योजना आणून कर्जमुक्ती योजनेत उर्वरीत शेतकऱ्यांना न्याय देणार आहे, असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख