आघाडीने पिढी वाया घालविण्याचे पाप केले : उदयनराजे  

 आघाडीने पिढी वाया घालविण्याचे पाप केले : उदयनराजे  

सातारा : कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सत्ताकाळात पिढी वाया घालविण्याचे पाप केले. त्यांच्या आडवा आणि जिरवा योजनेला लोक कंटाळले आहेत. भाजपची "महाजनादेश' यात्रा सरस ठरत आहे. महाजनादेश यात्रेमुळे राष्ट्रवादीची फसवेगिरी, बनवेगिरी उघड झाली असून, काम करणारे कोण आणि फसवणारे कोण हे लोकांच्या लक्षात आले आहे, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

मी दोघांच्या मिशांना घाबरतो. एक नरेंद्र पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या मिशांना, अशी आपल्या भाषणाची सुरवात उदयनराजेंनी केली आणि एकच जल्लोष उडाला. भाषण सुरू करेपर्यंत त्यांचे समर्थक "एक नेता एक आवाज, उदयन महाराज उदयन महाराज...'अशा घोषणा देत होते. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना काल डॉन म्हणाले होते आज त्यांनी आपल्या भाषणात शाहीर आमदार शिवेंद्रसिंहराजे असा उल्लेख केला.

 राजीनामा देऊन आलो म्हणून आनंद झालाय तुम्हा सर्वांना याची दाद दिली पाहिजे. काय स्टाईल आहे तुमची, असे कार्यकर्त्यांना संबोधत ते म्हणाले, ""मी महिनाभर विचार केला. एक नव्हे 15 वर्षे आयुष्याची गेली. जे कोण बोलताहेत त्यांनी आपल्या मनाला याबाबत विचारावे की मी हा निर्णय का घेतला? आघाडीच्या काळात मंत्र्यांकडे कोणतेही काम घेऊन गेलो तर फाईल डायरेक्‍ट डस्टबिनमध्ये जायची. 

18 वर्षे मी जे सहन केले त्याबद्दल राष्ट्रवादीने मला सहनशिलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. तेही माझ्या नशिबात नव्हते. माझे मताधिक्‍य सुरवातीच्या दोन निवडणुकांत वाढले; पण या निवडणुकीत निम्म्याने कमी झाले. हा माझा नैतिक पराभवच आहे. एकबार मैने कमिटमेंट करली तो मै खुदकी भी नही सुनता..या माझ्या डायलॉगवर तुम्ही सर्वांनी नेहमीच टाळ्या वाजविल्या. पद आणि कामांबाबत निराशाच नशिबी आली. सत्तेत असूनही एक रूपयाचेही काम करता आले नाही. नळावरच्या भांडणाप्रमाणे भांडावे लागले. पण पर्याय नव्हता. विरोधी पक्षाचा खासदार असूनही मुख्यमंत्र्यांनी 680 कोटींची विकासकामे माझ्या मतदारसंघात केली. तसेच 15 हजार कोटींची इतर कामांचा समावेश आहे.''

ते म्हणाले, "" मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, त्यांनी केलेली कामे ते लोकांसमोर ठेवत आहेत.आजपर्यंत 40 वर्षे रखडलेली कामे भाजपने पाच वर्षात केली. लोक कामांकडे पाहून मतदान करतात. ही कामाला लावणारी लोक नाहीत. कामे मार्गी लावणारी आहेत, हे जनतेने ओळखले होते. आता दुसऱ्याला कामाला लावणाऱ्यांचे काम करायचे ते जनतेने निर्णय करायचा आहे. फलटणमधील काहींनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. 

या लोकांच्या हातून पाप घडले ते त्यांना येथेच फेडावे लागणार आहे.'' शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या वक्तव्यावरच भाष्य करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.

ते म्हणाले, "'शिवेंद्र तुकडा-बिकडा असे काहीतरी संमजसपणे आणि सौम्य बोलले. मात्र माझ्याविषयी असे काही बोलू नका. जिथे आहात तिथे तुकडे काय असतात, हे दाखवून देईन. आता तर त्याची गरजही भासणार नाही. कारण त्याच तुकड्यासारखी तुमची अवस्था आहे. तुम्ही जर नीट वागले असता तर तुम्हाला आत्मक्‍लेष, आत्मचिंतन करण्याची वेळ आली नसती.''

पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र
पृथ्वीराज चव्हाणांचे नाव न घेता टीका करताना उदयनराजे म्हणाले, ""आपल्या जिल्ह्यातील सुपुत्राकडे राज्याची धुरा होती. पण त्यांना आमची कामे करता आली नाहीत. त्यांच्याकडे नियोजन नव्हते, इच्छाशक्तीही नव्हती. घोंगडे भिजत ठेवायचे आणि लोकांना घिरट्या घालत ठेवायचे. शेवटी वैतागून मी त्यांना एक पेन घेऊन दिला. 

तो पेन त्यांनी कामांच्या फाईलवर सह्या करण्याऐवजी खिशाला लावला. कशी सही करायची असे विचारले. पेन खिशात ठेवल्यास काय ठेंगा काम होणार? असा प्रश्‍न करून उदयनराजे म्हणाले, ""त्यांना माझा बॅण्ड वाजवायचे ठरविले होते. पण मी हुशार निघालो. कोणीही माझा बॅण्ड वाजवू शकत नाही. मी स्वत: दुसऱ्यांचा बॅण्ड वाजवितो. कारण मी बॅण्ड मास्तर आहे, असे म्हणताच एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com