अंगावर याल तर शिंगावर घेऊ- उदय सामंत यांचा विरोधकांना इशारा

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची तयारी दाखवालतर स्वागत करू; मात्र अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशारा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या विरोधकांना दिला
Sinhudurg Guardian Minister Uday Samant Warns Opponents
Sinhudurg Guardian Minister Uday Samant Warns Opponents

सावंतवाडी : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना दीपक केसरकर यांना सोबत घेऊन काम करणार आहे. मी बंगल्यातून नाही जनतेमध्ये येऊन काम करणार असून जनेतच्या प्रश्‍नासाठी महिन्याचा एक दिवस जनता दरबार घेणार आहे, असे आश्‍वासन उच्च व तज्ञ शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  येथे दिले. या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची तयारी दाखविलात तर स्वागत करू; मात्र अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

येथील वैश्‍यभवन सभागृहात पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच तालुक्‍यात आलेल्या श्री. सामंत यांचा तालुक्‍याच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, प्रदिप बोरकर, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अण्णा केसरकर, योगेश नाईक आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, "खासदार राऊत व आमदार केसरकर यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आलेला निधी योग्यप्रकारे मार्गी लावताना विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम मी करणार आहे. शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळावा याकरता प्रशासन जनतेच्या दारी ही सकल्पंना राबवू; मात्र जिल्हावाशियांना अपेक्षित काम करताना केसरकर यांनी जी जबाबदारी पार पाडली तीच जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडू.''

ते पुढे म्हणाले, "यापुढे 2020 मध्ये जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याची जबाबदारी स्विकारा. त्यासाठी आत्तापासुन कामाला लागा. राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक मंत्री या जिल्ह्यात आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून जिल्ह्याला योग्य न्याय देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. निधी आणायचा एकाने व त्या कामाचा श्रेय घ्यायचे दुसऱ्याने असा प्रकार येथे सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंत्र्याच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांच श्रेय दुसऱ्याला घेण्यास देऊ नये. पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजनच्या कामाचे क्रेडीट विरोधकांना घेऊ देणार नाही.''

खासदार श्री राऊत म्हणाले, "सावंतवाडी शहर हे नेहमी शिवसेनेचा बालकिल्ला राहीला आहे. शिवाय या विधानसभा मतदार संघाचा विकास जर कोणी केला असेल तर तो केसरकर यांनी केला आहे. काल परवा पर्यत असलेला दहशतवाद आता येथे येऊन पोहचला आहे. या दहशतवादामुळे एकाचा राजकिय बळीही याठिकाणी गेला. त्यामुळे राजकारणात असलेली ही विकृती वेळीच येथील जनतेने गाढून टाकणे गरजेचे आहे. केसरकर यांनी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला, या शहराला भरपूर निधी दिला; मात्र यापुढे नव्या पालकमंत्र्याच्या घेऊन या जिल्ह्याला न्याय देऊ.''

श्री. केसरकर यांनी पालकमंत्री सामंत यांचे स्वागत करताना नवीन सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी कार्यरत राहू, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, राजन मुळीक, अमेय तेडोंलकर, राघोजी सांवत, अपर्णा कोठावळे, रश्‍मी माळवदे, निता सावंत, अनारोजीन लोबो, भारती मोरे, प्रशांत कोठावळे, महेश शिरोडकर यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com